तरूण भारत संवाद बेंबळे / वार्ताहर
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतापैकी एक औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला जेमतेम पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान भिमा नदीही कोरडी पडल्याने पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे उजनी धरणातून आज गुरूवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता भिमानदीत ३००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्या टप्प्याने वाढ करत ८००० क्युसेकने सोडणार आहेत.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औंज बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ आजमितीला फक्त ९ फूट पाणी असून, हे पाणी केवळ आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औंजला बंधाऱ्यात येण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधिक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.
औज बंधाऱ्यासोबतच भिमानदीवरील चौदा बंधारेही भरून घेतले जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्यस्थितीला उजनी धरण मृत साठ्यात असून त्यापैकी ३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ६० टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान सोलापूरसाठी उजनी धरणातील सुमारे ५.५ टी एम सी पाणी वापरले जाणार असून उजनी पाणीसाठा दहा ते बारा टक्क्यांनी कमी होणार आहे.
सध्या उजनी धरणातील पाणीपातळी
एकूण पाणीपातळी – ४९०.६०० मीटर
एकूण क्षेत्रफळ – १८९.६१ चौ. कि. मी.
एकूण पाणीसाठा – १७१९.५७ दलघमी
उपयुक्त साठा – – (उणे ८३.२४ दलघमी
एकुण पाणीसाठा – ६०.७२ टी.एम.सी.
उपयुक्त साठा – – (उणे) २.९४ टी.एम.सी.
टक्केवारी – – (उणे) ५.४९ टक्के
विसर्ग
नदी – ३००० क्युसेक
कालवा – ३,१५० क्युसेक
बोगदा – ५६० क्युसेक
Previous Articleग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला
Next Article सातारा : नागठाणेत मोफत कोविड सेंटरच्या मागणीला जोर









