प्रतिनिधी / मोहोळ
आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे साथीदारांच्या मदतीने गावातीलच सोनारावर पाळत ठेवली व पाच साथीदारांच्या मदतीने अंकोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य किरण गायकवाड याने या गुह्याचा कट रचला. दुकानातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख पाच हजारांचा माल घेऊन दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मुद्देमाल पळविला होता. सोनाराच्या समयसुचकतेमुळे व सौंदणे येथील शेतकऱ्यांच्या धाडसामुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मोहोळ तालुक्मयातील अंकोली येथे प्रकाश सदाशिव हंबीरे यांचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. अंकोलीतील माजी ग्रामपंचायत सदस्य किरण सज्जन गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी सोनार हंबीरे यांच्यावर पाळत ठेवली. त्याचे ओळखीचे नारायण चिंचोली येथील सोनू शंकर बनसोडे व उमेश रणदिवे यांना यासंदर्भात माहिती देऊन ठरल्याप्रमाणे अंकोली येथे शुक्रवारी (ता. 6) येण्यास सांगितले. सायंकाळी पाचच्या दरम्यान सोनू बनसोडे, त्याचा मित्र उमेश रणदिवे, अभिजित बंदपट्टे व मनोज वाघमारे यांच्यासह दोन दुचाकीवर अंकोली येथे आले. त्यावेळी किरण गायकवाड व योगेश गायकवाड यांनी त्यांना मिरची पावडरचे पाकीट व लोखंडी कोयता व स्वतः जवळील मोबाईल घेऊन योगेश गायकवाड याला त्यांच्या गाडीवर पाठविले.
सायंकाळी सातच्या दरम्यान गुह्यातील मुख्य सूत्रधार किरण गायकवाड याने सोनार प्रकाश हंबीरे खोलीतून निघाल्याची माहिती दिली. त्यानंतर धनू बनसोडे, उमेश रणदिवे, अभिजित बंदपट्टे, मनोज वाघमारे व योगेश गायकवाड यांनी प्रकाश हंबीरे व त्यांची पत्नी वर्षा यांना मोहोळकडे येताना सौंदणे कटजवळ अडवून जवळील मिरचीपूड त्यांच्या चेहऱयावर व अंगावर टाकून त्यांच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने व पैशांची बॅग असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळून गेले. थोड्या वेळाने चोरटे त्याच रस्त्यावरून जात असताना हंबीरे पती-पत्नीने पाहिले. राहुल कोकाटे, संदीप कोकाटे, राहुल फाटे यांना याबाबत सांगितले. त्यांनी समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना पकडले व त्यांच्याकडे असलेल्या बॅगेसहीत दोघांना पकडले. पोलिसांना फोन केला याबाबत तत्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश देशमुख, रवींद्र बाबर, मंगेश बोधले, अमोल गुळवे, विकास हजारे, वसीम शेख, हरीश थोरात व चालक चौधरी यांच्या पथकाने चोवीस तासांच्या आत या गुह्यातील इतर चार संशयित आरोपींना पकडले.
या गुह्यातील सहा आरोपींना पकडून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी सौंदणे येथील राहुल कोकाटे, संदीप कोकाटे व राहुल पाटील तसेच पोलीस निरीक्षक अशोक सायकर, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांचे अभिनंदन केले.









