छावा संघटनेचे दक्षिण तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांचा इशारा
अकार्यक्षम कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विध्यापीठात पाच विद्यार्थ्यांचे पीएच. डी. चे रेकॉर्ड गहाळ प्रकरणी राज्यपाल यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला 17 महिने होवून गेले तरी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी कारवाई केली नाही. त्यामूळे अकार्यक्षम कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा राज्यपाल कार्यालयासमो अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे छावा संघटनेचे दक्षिण तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांचे पीएच. डी. चे रेकॉर्ड गहाळ केल्यामुळे सहा. कुलसचिव म. म. हैनाळकर यांच्यावर अभिलेख कायदा 2005 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची पुराव्यानिशी मागणी 14 मार्च 2019 रोजी छावाचे दक्षिण तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी राज्यपाल आणि कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर 10 एप्रिल 2019 रोजी गणेश मोरे यांनी राज्यपाल यांना स्मरण पत्र पाठवून सहा. कुलसचिव हैनाळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
मोरे यांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्यपाल यांनी 18 एप्रिल 2019 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला 17 महिने होवून गेले तरी कुलगुरू फडणवीस यांनी सहा. कुलसचिव हैनाळकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. कुलगुरू फडणवीस यांनी सहा. कुलसचिव हैनाळकर यांना सपशेल पाठीशी घातले आहे. राज्यपालांच्या आदेशाला सुध्दा कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यावर विलंब कायदा 2005 आणि महाराष्ट्र नागरी सेवा 1979 च्या विविध कलमांनुसार तात्काळ कारवाई करून सेवा पुस्तिकामध्ये नोंद करण्याची मागणी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी निवेदनाद्वारे राज्यपाल यांच्याकडे केली आहे. तसेच पीएच. डी. रेकॉर्ड गहाळ करणारे सहा कुलसचिव हैनाळकर व त्यांना पाठीशी घालणारे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या दोन्ही अधिकाऱ्यावर 15 दिवसात कारवाई न केल्यास राज्यपाल कार्यालयासमोर राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे दक्षिण तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी निवेदनाद्वारे राज्यपाल यांना दिला आहे.