प्रतिनिधी /कुर्डुवाडी
पतीच्या खून प्रकरणी तक्रारीची दखल कुर्डुवाडी पोलिसांनी घेतली नाही. शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवत तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिराळ ता.माढा येथे घडली. सागर सरवदे असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रियांका सागर सरवदे (वय-३० रा. शिराळ ता. माढा) या पोलीस पाटील महिलेस आरोपी रणजित धनाजी पांडगळे (२०), रोहित धनाजी पांडगळे (१९) व धनाजी संभाजी पांडगळे (४५, सर्व रा. शिराळ ता. माढा) पैकी रणजित हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पाठलाग करून मानसिक त्रास देत होता. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसाठी फिर्यादी विवाहिता माहेरी फलटण येथे गेली असताना पती सागर याला या तिघा संशयितांनी भांडण काढून मारहाण केली. व रणजित याने तुझ्यामुळे तुझी बायको माझ्याबरोबर संबंध ठेवत नाही आता तुला खलास करतो म्हणून मारहाण केल्याचे सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी दि १८ रोजी सरपंचानी फोन करून फिर्यादी प्रियांका यांना पतीचे निधन झाल्याचे सांगितल्या नंतर पतीचा खून झाला असल्याची फिर्याद देण्यासाठी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाद मागितली. २४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी व ३० नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस आयुक्त ग्रामीण यांच्याकडे दाद मागितली. मात्र कोणीही दखल न घेतल्याने फिर्यादी यांनी ॲड.हरीश्चंद्र कांबळे यांच्या द्वारा न्यायालयात धाव घेतली.
माढा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एस एस सय्यद यांनी दिलेल्या आदेशा वरून आज, रविवार कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तिघा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 15 रूग्ण, 28 कोरोनामुक्त
Next Article आशियाई स्पर्धेत बिलीयर्ड्सचे पुनरामन









