तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मंगळवारी तब्बल 45 रूग्ण हे कोरोनामुक्त होउन उपचारानंतर घरी परतले आहेत. त्यामुळे एकीकडे रूग्णसंख्या वाढत असताना. दुसरीकडे पंढरपूरात रूग्ण हे कोरोनामुक्त देखिल अधिक गतीने होत आहेत.
पंढरपूरची रूग्णसंख्या सोमवारी संध्याकाळपर्यत तब्बल 420 पर्यत जाऊन पोहोचली होती. यामध्ये सोमवारपर्यत 266 रूग्ण हे उपचार घेत होते. या रूग्णांपैकीच तब्बल 45 रूग्ण हे बरे झाले आहेत. यामधे 43 रूग्ण हे वाखरीच्या एमआयटी येथील कोविड केअर सेंटरमधून परतले आहेत. तर उर्वरित रूग्ण हे जनकल्याण हॉस्पिटल आणि उपजिल्हा रूग्णालयातून कोरोनामुक्त होउन परतले आहेत. त्यामुळे आतापर्यत शहरातून तब्बल 192 रूग्ण हे बरे झाले असल्यांची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसात पंढरपूरात रूग्णसंख्या वाढत असताना. येथील प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलिस उपाधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यांचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. यामध्ये काही ठिकाणी नागरिकांचा देखिल चांगला प्रतिसाद प्रशासनास मिळत आहे. तर काही ठिकाणी योग्य तो प्रतिसाद नसताना देखिल प्रशासन काम करीत आहे. अशातच पंढरपूरातील कोरोनाबाधित रूग्ण हे बरे होत आहेत.
यामधे येथील उपजिल्हा रूग्णालयांच्या डॉ. जयश्री ढवळे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले हे रूग्णांवर देखिल चांगल्या पध्दतीने उपचार करीत आहेत. त्यामुळेच रूग्ण वाढत असताना. रूग्ण बरे होण्यांचे प्रमाणदेखिल सरासरी प्रमाणात चांगले असल्यांने येथील कोरोनाचा संसर्ग सध्यातरी नियंत्रणात असल्यांचे बोलले जात आहे.









