सोलापूर : प्रतिनिधी
कामगारांना पावसाळा सुरु होण्यापूर्वीच जुन महिन्याच्या सुरुवातीला रेनकोटचे वाटप करणे गरजेचे होते. परंतू महपौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी. शिवशंकर यांचा अजब कारभार सुरु असून त्यांनी कामगारांना पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट खरेदी करुन वाटप केले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने घनकचरा विभागातील सफाई कामगार व झाडूवाले, बिगारी यांना पाऊसापासून संरक्षण होण्यासाठी आज, शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम व मनपा उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी यांना रेनकोट वाटप केले. यावेळी मुख्य सफाई अधिक्षक संजय जोगधनकर, सफाई अधिक्षक व कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे, सफाई अधिक्षक एन. सी. बिराजदार, विभागीय कार्यालय क्र.5 चे विभागीय अधिकारी शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक आय. जी. बिराजदार, आरोग्य निरीक्षक नल्लामंदू, दिनेश इंगोले, नागराज रातल्लू, वाहिद शेख, गौरीशंकर बनसोडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
दोन वर्षाची खरेदी
-कामगारांसाठी आम्ही दोन वर्षाचे रेनकोट आठ दिवसांपूर्वी खरेदी केलेले आहेत. सदरची खरेदी शासनाच्या जीईएम पोर्टल वरून केलेली आहे. रेनकोटची क्वालिटी चांगली आहे.
-पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा
सोळाशे कामगारांसाठी 4 हजार रेनकोट खरेदी
-महापालिकेकडे 1600 कामगार आहेत. तर 4 हजार रेनकोटची खरेदी आठ दिवसांपूर्वी केली असल्याचे मुख्य सफाई अधिक्षक संजय जोगधनकर यांनी सांगितले. तसेच 200 रुपये ला एक रेनकोट असे एकूण 8 लाख रुपयेची रेनकोट खरेदी झाली आहे. या खरेदीबाबत महापालिकेत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. याबाबत महापौर श्रीकांचना यन्नम यांना संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
Previous Articleराज्य सरकार आणि धनगर समाज संघर्ष अटळ:आ पडळकर
Next Article डॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु









