तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एकीकडे जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहे. दुसरीकडे विशेष उपायोजना होण्यासाठी व गरजूंना मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी समोर येत आहेत. यामध्ये आता मुस्लिम समाज ही मागे राहिलेला नाही. सोलापुरातील नई जिंदगी येथील अल फुरकान मदरशाची जागा दोन महिन्यांकरिता आयसोलेशन वार्डसाठी देण्याची घोषणा अल फुरकान एज्युकेशनल अंड वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर यांनी केली.
सध्या सोलापुरात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही परंतु पुढे भविष्यात गरज भासल्यास आपल्या मदरशाची जागा आयसोलेशन वार्डसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा मौलाना हारीस यांनी केली. कोरोना वायरस रोखण्याच्या प्रयत्नात आम्ही देशा सोबत आहोत. आमच्या संस्थेद्वारे एक अरबी मदरसा चालवला जातो. चंद्रकला नगर येथील हा मदरसा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे.
तरी या मदरशाची जागा आम्ही मदरसा सुरू होईपर्यंत आयसोलेशन वार्ड साठी उपलब्ध करून देणार आहोत. मुहम्मद पैगंबरांच्या शिकवणीनुसार हे फार मोठे व पुण्याचे काम आहे. मदरसा सुरू होईपर्यंत सदरची जागा रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे तरी आपल्यास गरज भासल्यास आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी, अशा मागणीचे पत्र मौलाना हारीस यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त दीपक तावरे , सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे यावेळी दस्तगीर शेख, वसीम शेख आदी उपस्थित होते.