प्रतिनिधी / सोलापूर
राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावी या वर्गांना सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोलापूर शहरातील पानगल उर्दू हायस्कूलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. स्कूल चले हम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बॅग देऊन व फलकावर शुभेच्छा लिहून स्वागत केले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक इक्बाल बागवान यांनी दिली.
आज प्रत्येक शाळेत शासन नियमाप्रमाणे विद्यार्थी उपस्थित राहिल्याचे दिसून आले, शाळा जरी दुपारी उघडनार असली तरी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्येक शाळेत लगबग दिसून आली. उपस्थित प्रत्येक विद्यार्थी मास्क, सॅनीटायझरसह हजेरी लावलेला दिसला. त्यानंतर शाळेत उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात आली. एका वर्गात 10 ते 15 विद्यार्थी होते व एक बाक सोडून दुसऱ्या बेंचवर विद्यार्थी बसले होते. शाळेचा पहिला दिवस असला तरी विद्यार्थ्यांच्या चांगला प्रतिसाद मिळाला, हळूहळू विद्यार्थ्यांचा पुढे चांगला प्रतिसाद मिळेल असेही बागवान यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्वभागातील कुचन प्रशाला येथे विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यावेळी पाच ते दहा विद्यार्थी एका वर्गात दिसून आले. याठिकाणी कोरोनाच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी आहे, यानंतर पुढे चांगला प्रतिसाद मिळेल असेही मुख्याध्यापक शरद पोतदार यांनी सांगितले.