राज्यात कोरोना संसर्ग होतोय कमी : दिवसभरात 57,333 जण डिस्चार्ज
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच संसर्गमुक्त होणाऱयांचे प्रमाण वाढल्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. राज्यात सोमवारी 25,311 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 4,40,435 वर पोहोचली आहे. दरम्यान दिवसभरात दुपटीपेक्षा अधिक म्हणजेच 57,333 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मागील चोवीस तासांत 529 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य खात्याच्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 24,50,215 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 19,83,948 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 25,811 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बेंगळुरात 5,701 पॉझिटिव्ह
सोमवारी बेंगळूरमध्ये केवळ 5,701 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर येथे मागील चोवीस तासांमध्ये 34,378 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. त्यामुळे येथील सक्रिय रुग्णसंख्या 2,26,868 पर्यंत खाली आली आहे. दिवसभरात बेंगळूरमध्ये 297 रुग्णांचा बळी गेला आहे.
बेंगळूरमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यास आरोग्य खाते आणि महापालिका यशस्वी ठरत आहे. मात्र, राज्यातील बेळगाव, बळ्ळारी, धारवाड, हासन, म्हैसूर, रायचूर, मंगळूर, मंडय़ा आणि तुमकूर या जिल्हय़ांमध्ये मात्र, नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. उर्वरित जिल्हय़ांमधील स्थिती समाधानकारक आहे.
कोरोना नियंत्रणासाठी ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची सूचना आरोग्य खात्याने दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.









