एका दिवसातील सर्वाधिक संख्या : 133 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल सोमवारी एका दिवसात 258 एवढय़ा विक्रमी संख्येने कोरोनाबाधित सापडले असून तो आतापर्यंत प्रतिदिनाचा उच्चांक ठरला आहे. कोरोनाच्या रुग्णांनी एकाच दिवसात दोनशे पार करून उसळी मारल्याने आता खरोखरच भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे.
काल 133 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतच्या बळींची संख्या 36 आहे. कोरोनाचे सक्रीय रुग्ण 1673 एवढे असून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5119 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 3410 जण बरे झाले आहेत. अद्याप 6116 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
आरोग्य खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 10 विदेशी तर 16 देशी प्रवाशांना होमकोरंटाईन करण्यात आले आहे. एकूण 17 जणांना पॅसिलिटी कोरंटाईन, तर 30 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विविध हॉटेल्स, रेसिडन्सीमध्ये 171 जणांना कोरंटाईन करण्यात आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या – सांखळी 73, म्हापसा 37, पणजी 53, कांदोळी 39, कोलवाळ 44, चिंबल 79, मडगाव 116, वास्को 363, बाळ्ळी 39, कुठ्ठाळी 369, धारबांदोडा 32, फोंडा 78, नावेली 23, लोटली 29, कुडतली 22, कासावली 12, कुडचडे 11, पर्वरी 19, शिवोली 15, खोर्ली 20, कासारवर्णे 19, बेतकी 8, हळदोणे 10, वाळपई 10, पेडणे 6, डिचोली 8, त्याशिवाय विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 103 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
राजधानी पणजी शहरासह कोरोनाचे रुग्ण वाढत असून गेले काही दिवस विविध भागात दररोज नवीन रुग्ण मिळत आहेत. एकूण संख्या 53 वर पोहोचली आहे. गोव्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून ती वाढ जनतेमध्ये धडकी भरवणारी ठरत आहे.
कालच्या एक दिवसीय अधिवेशनात या कोरोना परिस्थितीवर चर्चा होण्याची जनतेची अपेक्षा होती. विरोधकांनी तशी मागणीही केली होती. परंतु तेथे काहीच झाले नाही. मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांनी फक्त भाषणे ठोकून सरकारची बाजू उचलून धरली. कोरोना नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना सूचविली नाही.
कोरोनाचे व्यवस्थापन योग्य मार्गाने : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विधानसभेत दावा : उपचार चांगले होतात म्हणून अनेकजण कोरोनामुक्त : सरकारी इस्पितळांत कोरोनावर सर्व उपचार मोफत
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोविडचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करून कोरोना रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळत असल्याने ते बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, असे मत त्यांनी काल सोमवारी विधानसभेत प्रकट केले. सरकार त्यात कुठेही अपयशी ठरलेले नाही, मागे राहिले नसल्याचे ते म्हणाले. जनतेने आपापली जबाबदारी ओळखून सर्व शिष्टाचाराचे पालन करावे, आणि कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेत कोविड विषयावर निवेदन करताना डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की योग्य वेळी उपचार होणे गरजेचे आहे. ते मिळाले की रुग्ण बरे होतात. त्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात, सरकारी इस्पितळात जाऊन तपासणी करावी. कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. त्यासाठी पैसे घेण्यात येत नाहीत.
कोरोना संकटाशी सर्वजण मुकाबला करीत असून त्याचे संक्रमण आता कमी होऊ लागले आहे. लोकांनी घाबरू नये. कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी व इतर अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह झाले पण त्यांनी कोरोनावर मात केली. सामाजिक प्रसार माध्यमातून (सोशल मीडिया) अनेकजण खोटे संदेश देतात, अफवा फसरवतात. तसे कोणी करू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. कोरोनासंदर्भात प्रशासन पूर्णपणे पारदर्शक असून कोणतीच माहिती लपवून ठेवली जात नसल्याचे ते म्हणाले. इतर गंभीर आजार असल्याने काहीजण कोरोना झाल्यामुळे बळी पडतात असेही त्यांनी निदर्शनास आणले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेने सरकारसोबत राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची परिस्थिती चांगली असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.









