प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिपरिप पावसानंतर सोमवारी पहाटेपासूनच दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. गणेशोत्सव काळातच सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. फेरीवाले, बैठे व्यापारी तसेच खरेदीदारांना पावसात भिजतच व्यवहार करावा लागला. यामुळे पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला.
सध्या शाळा तसेच महाविद्यालये सुरू असून विद्यार्थी शाळेला जात आहेत. त्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सोमवारी सकाळीही तसेच दिवसभर पावसाच्या दमदार सरी अधूनमधून कोसळत होत्या. पावसामुळे अनेक रस्त्यांवर व सखल भागांमध्ये पाणी साचले होते.
बाजारपेठेमध्येही पावसामुळे काहीशी दलदल निर्माण झाली होती. त्यामधून पादचाऱयांना वाट काढताना मोठा त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीअंतर्गत बऱयाच ठिकाणी कामे सुरू आहेत. कामे अर्धवट असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले होते. महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानंतर आता बेळगावमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे भातपिकासह इतर पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा सध्या तरी सुखावला आहे.









