चार ठिकाणे निश्चित : जिल्हाधिकाऱयांचा आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजी विक्री आणि खरेदीमध्ये बदल करण्यात आला असून सोमवार दि. 6 पासून शहराबाहेरील चार ठिकाणी भाजीची खरेदी व विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिले आहेत.
एपीएमसी भाजीमार्केटमध्ये विक्री व खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे हिंडाल्को मैदान, ऑटोनगर येथील आरटीओ मैदान, पोदार स्कूलचे मैदान आणि जुन्या धारवाड (बी. एस. येडियुराप्पा) रोडवरील एका खुल्या जागेमध्ये ही भाजी विक्री केली जाणार आहे.
कोरोनामुळे आता भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन रुग्ण पॉझिटिक्ह आढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोठी दखल घेतली आहे. सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी आणि खरेदीदार एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात एपीएमसीमध्ये दाखल होतात. त्यामुळे गर्दी होत आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू मिळण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होवू नये यासाठी शहराच्या चार ठिकाणी भाजी विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता खरेदीदारांना त्या ठिकाणी उपस्थित राहून भाजी खरेदी करावी लागणार आहे. तेव्हा सर्व खरेदीदारांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









