-महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/कोल्हापूर
उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील घटनेत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिह्यात हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
उतर प्रदेशमधील लखीमपुर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत असगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
उद्योग, व्यापारासह राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद
या बैठकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी 11 सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्र बंद बाबत आपली मते मांडली. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडप्रमाणे शेतकऱयांचे हत्याकांड केले. शेतकऱयांना आदरांजली वाहण्यासाठी आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, उद्योगांसह आणि राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये. तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा बंद यशस्वी करूया असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
महाविकास आघाडीचे सरकार हिमालयाप्रमाणे शेतकऱयांच्या पाठीशी
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधातील कायदा पारित केला. याला जोरदार विरोध करत दिल्लीत गेल्या वर्षभरापासून शेतकऱयांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. मात्र आंदोलनाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पंतप्रधान कार्यालयाला हे आंदोलन दिसत नाही. बहुमत मिळाले म्हणून घटनेची पायमल्ली करून भाजप आपल्याला हवे तसे कायदे केले जात आहेत. शेतीचे व्यापारीकरण सुरू असून या भाजप सरकारने भांडवलदारांच्या हातात शेती देण्याचा घाट घातला आहे. त्याचबरोबर सहकार मोडीत काढून मोजक्या लोकांच्या हातात द्यायचा डाव भाजप सरकार रचत आहे. लखीमपूरमधील घटना 3 सप्टेंबर रोजी घडली आहे. मात्र गेल्या सात दिवसांत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आपण शेतकऱयांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहून महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचे सिद्ध करु. त्यासाठी हा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती
जिल्हा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या काही दिवसात देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशातील राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र बंद यशस्वी करूया असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
बंद यशस्वी करण्याचा निर्धार
खासदार धैर्यशील माने यांनी केंद्राच्या विरोधात नक्कीच आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद यशस्वी करूया असे आवाहन केले. तर आमदार चंद्रकांत जाधव यांनी देशात शेतकरी विरोधी राजकारण चालू आहे. शेतकऱयांची हत्या करून त्यांनी निर्दयीपणा दाखविला आहे. आज पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार दडपशाही करत आहे. हे सरकार भांडवलदारांचे आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सर्वजण एकजूट होऊन लढूया असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
शाळा, कॉलेजही राहणार बंद
शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी देशाचा कणा असणाऱया शेतकऱयांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिह्यातील शैक्षणिक व्यासपीठाकडून सर्व शाळा बंद ठेवून या बंदला पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, राजूबाबा आवळे यांनी केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी विरोधी आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
आज रात्री 8 वाजता कँडल मार्च
यावेळी महाविकास आघाडीच्या उपस्थित नेते आणि पदाधिकाऱयांनी 11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार केला. तर 10 ऑक्टोबर रोजी रात्री वाजता शिवाजी चौक ते बिंदू चौकापर्यंत कँडल मार्च काढण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. या बैठकीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.