जावली तालुक्यात खळबळ : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / सातारा
सोमर्डी (ता. जावली) येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकून तीन पाणी जुगार खेळणाऱया 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून जावली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी जुगार खेळणाऱया चंद्रकांत विष्णू सोनावणे (वय 49 रा. सोमर्डी ता. जावली), आनंदराव बाबुराव जवळ (वय 50 रा. जवळवाडी ता. जावली), संतोष चंद्रकांत वारागडे (वय 48 रा. मेढा ता. जावली), प्रमोद दत्तात्रय खटावकर (वय 48, रा. कुडाळ ता. जावली), अशोक सोपान चिकणे (वय 49 वर्ष रा. खंडाळा कण्हेरी, ता. खंडाळा), गणेश दगडू साळवी (वय 39 रा. धनकवडी बालाजीनगर पुणे), राजू विश्वनाथ मंडल (वय 38 रा. बालाजीनगर पुणे), रुपेश तुकाराम साबळे (वय 42 रा. शिवथर ता. सातारा), दिलीप काशिनाथ कुंभार (वय 53 रा. कुंभारवाडा मेढा ता. जावली) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 10 रोजी सातारा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना सोमर्डी, ता. जावली येथील एका घरात जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
सूचना मिळताच गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तेथे 9 व्यक्ती तीन पानी जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आला असून घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस हवालदार तानाजी माने, अतीश घाडगे, संजय शेळके, विजय कांबळे, पोलीस नाईक प्रवीण कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल घाडगे, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार संजय ओव्हाळ, गजानन तोडकर यांनी सहभाग घेतला.









