वाळूवाहू ट्रकची बोलेरोला धडक
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमनट्टी (ता. बैलहोंगल) जवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. तर अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. वाळूवाहू ट्रकची बोलेरोसह आणखी एका वाहनाला धडक बसल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती समजताच नेसरगीचे पोलीस उपनिरीक्षक वाय. एल. शिगीहळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातातील चार जखमींना रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
फकिराप्पा भीमशाप्पा तुळजण्णावर (वय 38, रा. सोमनट्टी) याचा उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणताना वाटेतच मृत्यू झाला आहे. तर संतोष (वय 25, रा. अनगोळ), बसवराज इंचल (वय 36, रा. चचडी), नदीम बसरीकट्टी (वय 24, रा. पारिश्वाड), बसवराज गुडदळ्ळी (वय 30, रा. अंकलगी) अशी जखमींची नावे आहेत.
जिल्हा पोलीस प्रुमख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता नेसरगी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. उपलब्ध माहितीनुसार अपघातात एक जण जागीच ठार झाला तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविताना एका जखमीचा मृत्यू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.









