गोळीबारात सदस्यासह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
श्रीनगर / वृत्तसंस्था
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हय़ात सोपोर येथे सोमवारी दहशतवाद्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात एक सदस्य आणि त्याचा वैयक्तिक सुरक्षारक्षक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफचे जवान मोठय़ा संख्येने घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. सोपोरमधील हल्ल्यानंतर परिसरात हाय अलर्ट जारी करत सैन्याने येथे व्यापक शोधमोहीम सुरू केली. याशिवाय परिसरात कडक नाकेबंदी करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोपोर नगरपालिका कार्यालयाबाहेर बीडीसी सदस्य रियाज अहमद आणि त्यांचा सुरक्षा रक्षक शफात अहमद यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. तर अन्य सदस्य शमसुद्दीन पीर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.









