नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरू आहे. दिल्लीतील सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 320 रुपयांनी कोसळल्यामुळे आता 46 हजारांच्याही खाली आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र नाममात्र तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 28 रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव 68 हजार 283 रुपये झाला आहे. मुंबईत सोने दर प्रतितोळा 46 हजार 690 रुपये झाला आहे. चांदी दरात मात्र मुंबईत बुधवारच्या तुलनेत 600 रुपयांनी कपात झाल्यामुळे प्रतिकिलो दर 69 हजार रुपये झाला आहे.
दिल्ली सराफी बाजारामध्ये बुधवारी सोने प्रतितोळा 46 हजार 187 रुपये होते. गुरुवारी हा दर 320 रुपयांनी खाली आल्यानंतर 45 हजार 867 रुपयांवर स्थिरावला. भारतात सोन्याचे दर आता विक्रमी पातळीवरून 9 हजार 800 रुपयांनी कमी झाले आहेत. अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर जून 2020 च्या पातळीवर आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना सोन्याच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोने-चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्के कपात करण्यात आल्यामुळे सोन्याचे भाव कमी होत आहेत. एक्स्चेंज टेडेड फंडातूनही सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने अमेरिकेसह विविध देशांच्या सरकारच्या रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे.









