ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या दिवंगत पक्षप्रमुख जयललिता जयराम यांच्या निवासस्थानातून 4 किलो सोने, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तके, 38 एसी, 10 हजार 438 ड्रेसेस अशा एकूण 32 हजार 721 वस्तू तामिळनाडू सरकारने ताब्यात घेतल्या आहेत.
जयललिता यांच्या वेदा निलयम या तीन मजली घराचे स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. या स्मारकात त्यांच्या काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या वस्तू तामिळनाडू सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. यातील निवडक वस्तूच या स्मारकात पहायला मिळणार आहेत.
जयललिता यांचे वेदा निलमय हे घर त्यांच्या दिवंगत आईने खरेदी केले आहे. या घराचे स्मारकात रूपांतर व्हावे यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी हे निवासस्थान ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. हे निवासस्थान ताब्यात घेण्यासाठी सरकारने 25 जुलै रोजी सिव्हिल कोर्टात 67.9 कोटी जमा केले आहेत.
या स्मारकासाठी मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वात जयललिता फाऊंडेशनची स्थापनाही करण्यात आली आहे. या फाऊंडेशनचे सदस्य राज्य सरकारमधील इतर मंत्रीही आहेत. मात्र, जयललितांच्या घराचे स्मारक करण्यास त्यांचा पुतण्या दीपक आणि पुतणी दीपा यांनी राज्य सरकारचा विरोध केला आहे.









