नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोने दर सोमवारी नियंत्रित राहिल्यामुळे खरेदीदारांनी दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोमवारी सकाळी पुन्हा सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. याशिवाय चांदीसुद्धा स्वस्त झाली आहे. एमसीएक्सवर सोन्यात मार्चचा फ्यूचर टेड 39 रुपयांच्या घसरणीसह 47,217 रुपयांच्या स्तरावर सुरू होता. तर, चांदीचा मार्चचा फ्यूचर टेड 130 रुपयांच्या घसरणीसह 68,608 रुपयांच्या स्तरावर टेड करत होता. मात्र, दिवसअखेर सोने दरात वाढ झाल्यामुळे 47 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. तर चांदीचा दर 69 हजार 200 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवर आयात शुल्कात मोठय़ा कपातीची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीवर आयात शुल्कात 5 टक्केची कपात केली आहे. सध्या सोने आणि चांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागते. 5 टक्केच्या कपातीनंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जात असल्यामुळे सोने-चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
मागील 6 सत्रांपैकी 5 सत्रांत सोन्याच्या किंमतीत घसरण आली आहे. ज्यामुळे सोने आपल्या ऑगस्ट 2020 च्या विक्रमी उच्च 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 9000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारपेठेतही सोन्याची विक्री वाढलेली दिसत आहे. सोमवारी अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 2.92 डॉलरच्या घसरणीसह 1,811.22 डॉलर प्रति औंसच्या रेटवर होत आहे. तर, चांदीचा व्यवहार 0.03 डॉलरच्या तेजीसह 26.94 डॉलरच्या स्तरावर होत आहे.









