एनआयएची न्यायालयात माहिती : भारतविरोधी कारवायांसाठी पैसा वापरला जात असल्याचा संशय
कोची / वृत्तसंस्था
केरळमधील सोने तस्करीचे धागेदोरे आता अंडरवर्ल्डशी जोडलेले असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणात आरोपींचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एनआयएने कोची न्यायालयाला दिलेल्या लेखी उत्तरात हा संशय व्यक्त केला आहे. एनआयएने या प्रकरणातील संशयित आरोपी रमीज केटी आणि सरफुद्दीन यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जाचा विरोध करताना हे उत्तर दिले. तसेच त्यांनी न्यायालयाला आरोपींचा जामीन नाकारण्याचीही विनंती केली. दरम्यान, सोन्याच्या तस्करीतून मिळणारा पैसा भारतविरोधी तसेच दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याची शक्मयता गुप्तचर यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती एनआयएने दिली असून सोने तस्करीतील आरोपींच्या जामिनाला विरोध दर्शवला आहे.
रमीज केटी आणि सरफुद्दीन या दोन्ही संशयितांनी टांझानियाची यात्रा केली होती. या आफ्रिकेतील देशांतील बंदुका विकणाऱया दुकानांमध्ये ते गेले होते. टांझानियामध्ये रमीज याने हिऱयांचा व्यापार करण्याचा परवाना मिळवण्याचे प्रयत्न केले होते. नंतर ते युएईला पोहोचले. तिथून सोन्याची तस्करी करण्यासाठी ते केरळला आले. टांझानिया आणि दुबई या दोन्ही देशांमध्ये दाऊद इब्राहिमची डी-गँग कार्यरत आहे. टांझानियामध्ये डी-कंपनीसाठी फिरोज नामक एक दक्षिण भारतीय इसम ओऍसिस पाहतो. त्याचाच आधार घेत आरोपी रमीज याचे धागेदोरे डी-कंपनीशी असल्याचा संशय एनआयएने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
सोने तस्करीचा संशयित आरोपी रमीज केटी याला 2019 मध्ये अटक झाली होती. त्याला 13.22 एमएम बोर रायफलची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळीही सोन्याची तस्करी चालूच होती. आपल्याकडे संशयित आरोपी सरफुद्दिनचा एक फोटोही असून त्यात तो टांझानियामध्ये हातात रायफल घेऊन दिसत असल्याचे एनआयएने म्हटले आहे.
केरळमध्ये 5 जुलै रोजी सोन्याच्या तस्करीचे प्रकरण उजेडात आले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी एक विदेशातून आलेले पार्सल पकडले होते. हे पार्सल संयुक्त अरब अमिरातीतून पाठवण्यात आले होते. विदेश मंत्रालयाच्या परवानगीनंतर हे पार्सल उघडले गेले. तपासानंतर यात जवळपास 15 कोटी रुपये किंमतीचे 30 किलो सोने मिळाले होते. एनआयएने याप्रकरणी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांच्यासह काही अन्य लोकांना आरोपी केले होते.
दोन संशयितांनी जामीन अर्ज घेतला मागे
सोने तस्करी प्रकरणी बुधवारी दोन संशयित स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांनी आपला जामिनाचा अर्ज परत घेतला. स्वप्ना सुरेश केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (केएसआयटीईएल) या संस्थेत काम करत होती. हे आयटी विभागाच्या अखत्यारीत येते, जी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अधीन राहून काम करते. तस्करीप्रकरणी तिचे नाव आल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. तिने युएईच्या माजी वाणिज्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे. तर सरित कुमार तिरुवनंतपुरममध्ये युएई वाणिज्य दुतावासात पब्लिक रिलेशन अधिकारी म्हणून काम करत होता. त्यांना 6 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.









