प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील ओतारी गल्ली येथून सोने कारागिराचे अपहरण करून त्याच्याकडील 3 किलो सोने व 9 लाख रूपयांची रोख रक्कम चोरणाऱया आंतरराज्य टोळीला जिल्हा पोलिसांनी एका दिवसात गजाआड करण्याची मोठी कारवाई केली. 7 जणांच्या पुणे येथे मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून 1 कोटी 62 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एअर पिस्टल, बेडी, 3 वाहनांचाही समावेश आहे. या टोळीने महाराष्ट्रासह आसाममध्ये गुन्हे केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विशाल रावसाहेब ओहळ (34, वसगणी गार्डन पिपरी-पणे), नीलेश दिलीप भोईटे (28, भूपेंद्रचाळ पिपरी-चिंचवड), अजय राजू महाजन (26, कुजीर गणपती मंदिर पिंपळे सौदागर पिंपरी-चिंचवड), रासबिहारी मिताई मन्ना (38, खेराडे कॉम्प्लेक्स चिपळूण), आसिम कमरूद्दीन परकार (50, फुरूस फलसोंड-खेंड), एकनाथ कृष्णा आवटे (60, शिरूर-पुणे), राजेश रामकृष्ण क्षीरसागर (52, तळेगाव-दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या बाबत माहिती देताना गर्ग म्हणाले की, 6 मार्च रोजी सायंकाळी 7.40 वाजता तीन अज्ञात व्यक्ती अश्रफ फारूख शेख यांच्या शहरातील ओतारी गल्ली येथील सोन्याचे दागिने बनवण्याच्या कारखान्यात आले. यावेळी दोन कारागिरही होते. यावेळी त्यांनी आम्ही ऍन्टीकरप्शन पालघर येथून आलो आहोत, तुमच्याकडे बेकायदेशीर सोने व पैसे आहेत, त्याविषयी चौकशी करायची आहे, असे सांगून कारखान्यातील 1 कोटी 50 लाख रूपयांचा ऐवज ज्यात 3 किलो सोन्याची लगड, कॉईन व 9 लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन शेख यांना बेडी घालून त्यांना अपहरण करून खासगी वाहनाने मुंबईच्या दिशेने घेऊन गेले होते. त्यामुळे अज्ञातांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींना अटक करून शेख यांची सुटका करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता जिल्हय़ातील हुशार अधिकारी, अंमलदार अशा 7 जणांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, अंमलदार टेक्निकल ऍनालिसीस बँच यांची पथके तयार केली.
त्यांनी तपास सुरू केला असता हे आरोपी पुणे येथील असल्याची खात्री झाली. त्यानुसार 2 पथके पुणे येथे पाठवून आरोपी पोहचण्याआधी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 कोटी 50 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, लगड, ऑईन, 7 लाख 84 हजार 500 रूपयांची रोख रक्कम, तीन कार, एअर पिस्टल, स्टील बेडी असा 1 कोटी 62 लाख 85 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे गर्ग यांनी सांगितले.
आंतरराज्य टोळी
अटक केलेले आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर पुणे, बारामती, अकोला, ठाणेसह आसाम राज्यात 10 गुन्हे दाखल आहेत. यात आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे अनेक बाबी उघड होतील, असेही गर्ग यांनी नमूद केले.
तपास करणाऱया पथकाला 25 हजार रूपयांचे बक्षीस
आरोपींना एका दिवसात अटक करण्याची ही मोठी यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री पाटील, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, रत्नदीप साळोखे, संदीप पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शोखेचे हे. कॉ. विजय आंबेकर, मिलिंद कदम, शांताराम झोरे, टेक्निकल ऍनालिसीस बँचचे रमीज शेख, वृषाल शेटकर, शेलार, पडेलकर, माणके, दराडे आदींच्या पथकाने केली. त्यांचे मुंबई अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी अभिनंदन केले तर डॉ. गर्ग यांनी या पथकाला 25 हजार रूपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले.









