माजी पोलिसाचे पोलीस महासंचालकांना पत्र, पुणे-बेंगळूर हमरस्ता कमाईचे कार्यक्षेत्र, सराफ व्यावसायिकाकडून महिन्याला हप्ते
प्रतिनिधी / बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मंगळूरहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरल्याप्रकरणी गेल्या पाच दिवसांपूर्वी सीआयडीने एफआयआर दाखल केले आहे. या प्रकरणाला दिवसेंदिवस कलाटणी मिळत आहे. धारवाड येथील एका माजी पोलिसाने थेट राज्य पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास आणखी 12 ते 15 प्रकरणे उजेडात येतील, अशी माहिती दिली आहे.
अनेक वरिष्ट पोलीस अधिकाऱयांचे बिंग फुटणार आहे. आपले आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी त्यांनी ठेवलेल्या दलालांचे कारभारही उघडकीस येणार आहेत. त्यामुळे राज्य पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची सूचना सीआयडीला करावी. नपेक्षा ही प्रकरणे सीबीआयकडे सोपविण्यात यावीत, अशी मागणी बसवराज कोरवर या माजी पोलिसाने केली आहे.
सौदेबाजी केल्याचा थेट आरोप
दि. 26 मे रोजी बसवराज यांनी राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांना पत्र पाठविले आहे. सोनेरी टोळीचा म्होरक्मया किरणच्या कारनाम्यांबरोबरच त्याला पोसणाऱया पोलीस अधिकाऱयांविषयीही या पत्रात त्यांनी सविस्तर माहिती दिली असून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर या टोळीने एकूण 12 ते 15 वाहने अडवून संबंधितांशी सौदेबाजी केल्याचा थेट आरोप पत्रात केला आहे.
यासंबंधी ‘तरुण भारत’ने बसवराज कोरवर यांच्याशी संपर्क साधला असता साडेचौदा वर्षे आपण पोलीस दलात होतो. अशा प्रकारांना थारा दिला नाही म्हणून भ्रष्ट अधिकाऱयांच्या लॉबीने माझा बळी दिला. अजूनही ही लॉबी सक्रिय आहे. 9 जानेवारी 2021 रोजी हत्तरगी टोलनाक्मयाजवळ कार अडवून नंतर त्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरणारे वरिष्ट अधिकारी व त्यांचे दलाल यांनी अशी अनेक प्रकरणे केली आहेत, याची माहिती आपल्याजवळ आहे. ती आपण तपास अधिकाऱयांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सोनेरी टोळीचे कार्यक्षेत्र पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यापेक्षाही मोठी प्रकरणे वरिष्ट पोलीस अधिकारी व किरण यांच्या संगनमतातून झाली आहेत. 6 मार्च 2021 रोजी केरळहून मुंबईला जाणारे 2 कोटी 60 लाख रुपये रोकड व सोने पकडून या टोळीने परस्पर मोठी सौदेबाजी केली आहे.
याचबरोबर कलघटगी व धारवाड पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही दागिन्यांची वाहतूक करणारी कार अडवून सौदेबाजी करण्यात आली आहे. आता तर या टोळीचा म्होरक्मया किरणला सराफ व्यावसायिक महिन्याला हप्ते पोचवित आहेत. अशा टोळीमुळे पोलीस दलात प्रामाणिकपणे काम करणारेही बदनाम होत आहेत. म्हणून पोलीस दलाला बदनामीच्या दुष्टचक्रातून वाचविण्यासाठी संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळाव्यात. सखोल चौकशी केली तर काही आयपीएस अधिकाऱयांबरोबर सुमारे 15 डीएसपी अडचणीत येणार आहेत, असेही बसवराज यांनी पत्रात म्हटले आहे.
सीआयडीचा हुबळीत तपास
दि. 26 मे रोजी यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्यानंतर सीआयडी अधिकाऱयांचे एक पथक हुबळीत दाखल झाले आहे. कारमधील सोने चोरल्यानंतर कोणाकडे त्याची विक्री करण्यात आली, यासंबंधीची माहिती अधिकाऱयांनी जमविली आहे. चोरीचे सोने खरेदी करणारा ‘जेडी’ नामक सराफ सोनेरी टोळीचा म्होरक्मया किरणच्या जवळचा आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई, राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद हे या प्रकरणी जातीने लक्ष घालून आहेत. त्यामुळे सोनेरी टोळीच्या म्होरक्मयाच्या मुसक्मया आवळल्यानंतरच या टोळीविषयी भरपूर माहिती उघडकीस येणार आहे.









