पक्षाबाबत लवकरच घेणार निर्णय – सोनूच्या राजकारण प्रवेशाबद्दल गूढ कायम
वृत्तसंस्था/ जालंधर
बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहिण मालविका पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. मोगा विधानसभा मतदारसंघातून ती उभी राहणार असल्याची माहिती सोनू सूदने मोगा येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. अद्याप पक्ष कुठला याचा निर्णय घेतलेला नाही, पण लवकरच हा निर्णय घेऊ असेही त्याने सांगितले आहे.
बहिण निवडणूक लढविणार हे पहिले पाऊल आहे. त्यानंतर पुढील वाटचाल करत जाऊ असे त्याने म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सोनूने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे कौतुक केले आहे. लवकरच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांना भेटणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
बहिणीच्या कामाचे कौतुक
बहिण मालविकाने अनेक कामे केली आहेत. ती पंजाबची सेवा करेल अशी अपेक्षा आहे. कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पक्षापेक्षा त्याची विचारसरणी महत्त्वाची आहे. मालविका लोकांकडून दाखविण्यात येणारा विश्वास सार्थ ठरविणार आहे. आगामी काळात पक्षाच्या नावाबद्दलही सांगणार असल्याचे सोनूने म्हटले.
चर्चांचा बाजार गरम
सोनू सूद आम आदमी पक्षात जाणार असल्याची चर्चा पूर्वी सुरू होती. पण दोन दिवसांपूर्वी अचानक चंदीगडमध्ये त्याने मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांची गुप्त भेट घेत सर्वांना चकित केले होते. राजकारणात प्रवेश करण्याचा मार्ग स्वतःसमोर खुला असल्याचे त्याने म्हटले होते.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये मजबूत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाचा शोध आहे. सोनू सूद हा चेहरा असावा अशी चर्चा होती. सूदला दिल्ली सरकारने स्वतःचा ब्रँड ऍम्बेसिडर केले आहे. आप नेते अरविंद केजरीवालांस मनीष सिसोदिया देखील त्याचे कौतुक करत असतात.









