एक डिसेंबरला उत्सव, तहसीलदारांची परवानगी
वार्ताहर / सावंतवाडी:
यंदा सर्व उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आला आहे. दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेपासून कोकणातील महत्त्वाचे जत्रोत्सव सुरू होणार आहेत. मंदिरे अद्याप खुली नाहीत. त्यामुळे कोकणातील जत्रोत्सवांवर कोरोनाचे सावट कायम आहे. एक डिसेंबरला सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरा करण्याची परवानगी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. जत्रोत्सवात गर्दी टाळून पारंपरिक रुढीनुसार मानकऱयांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा करावा, अशा सूचना दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
शिमगोत्सव ते गणेशचतुर्थीपर्यंत सर्व महत्वाचे सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले. आता दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट आहे. सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती कमी होत चालली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दिवाळीनंतर कोकणातील जत्रोत्सव येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग ठेवून धार्मिक उत्सव करण्यास मुभा दिली आहे. दसरा उत्सव याच पद्धतीने गावागावात झाले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेपासून 20 दिवसांनतर कोकणातील जत्रोत्सव सुरू होणार आहेत.
एक डिसेंबरला सोनुर्ली जत्रोत्सव आहे. या उत्सवाला कर्नाटक, गोवा, कोल्हापूर येथून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. सोनुर्ली पंचक्रोशीतील गावकर मंडळींनी याबाबत तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेतली होती. म्हात्रे यांनी पारंपरिक पद्धतीने गर्दी टाळून उत्सव साजरा करा, असे आवाहन केले आहे.









