देशात पाच राज्यातील विधानसभेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर एका पेक्षा एक अनेक बातम्या येऊ लागल्या आहेत. ‘नेमके निष्ठावंत कोण’ हा एक प्रश्न प्रत्येक पक्षात उपस्थित झालेला आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा पण केलेला आहे. अद्याप या पक्षाला केरळ व बंगालमध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र यावेळी भाजपने पाच राज्यांपैकी सर्वाधिक भर बंगालवर दिलेला आहे. बंगालच्या दीदी ममता बॅनर्जी यांचे सरकार निखळून काढणे हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने ममतांच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक आमदारांना भाजपने आपल्या पक्षात ओढून आणले आहे. मात्र निगरगट्ट असलेल्या ममता बॅनर्जी सर्व शक्तीनिशी या निवडणुकीत भाजपवर तुटून पडत आहे. बंगालमधील काँग्रेस पक्षासमोर तसा प्रश्न निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने आपले आसन मजबूत करण्यासाठी व भाजपला एकटे पाडण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची साथ मागितली आहे. ज्या पक्षांना तिथे कोणतेही स्थान नाही, अशा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील राज्यपातळीवरील प्रादेशिक पक्षांनी तृणमूलला भाजपविरोधात पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने आता बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करण्याचा चंगच बांधलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु हा मिळणारा प्रतिसाद प्रत्यक्षात मतदानामध्ये रुपांतर होईल का हा प्रश्न आहे. अनेक राजकीय तज्ञांनी अद्याप भाजप द्वितीय स्थानी राहील. मात्र या पक्षाच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढतील, असे म्हटले आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपमध्ये ‘योजना आखणारे’ नेते आहेत. भाजपला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी या नेत्याने फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. सध्या बंगालची सारी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या खांद्यावरच सोपवलेली असल्याने अमित शहा यांनी गेले दोन महिने बंगाल राज्य अक्षरशः पिंजून काढलेले आहे. ज्या बंगालने भाजपकडे नेहमीच कानाडोळा केला त्याच बंगाली जनतेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का देत भाजपला तब्बल 18 जागांवर विजय मिळवून दिला. तृणमूलच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या या राज्यात झालेल्या पराभवाने अस्वस्थ झालेल्या ममतादीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना टार्गेट बनविलेले आहे आणि भाजपने सर्व शक्तिनिशी बंगालमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे प्रचंड सैन्य उतरविले आहे. आसाम, पंजाब, केरळ, तामीळनाडू, आणि पेंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सध्या साऱया देशाच्या नजरा बंगालमध्ये लागलेल्या आहेत. भाजपने देशातील बहुतांश राज्ये काबिज केली आहेत. ‘अगला सरकार भाजप का सरकार’ चा नारा भाजपने बंगालमध्ये लावला आहे. गेल्या वर्षी दीड वर्षापासून भाजपने बंगालमध्ये ग्रामीण पातळीवरून जे कार्य सुरू केले त्यातून तृणमूल काँग्रेसची अनेक भागात पाळेमुळे उखडायला सुरुवात झाली. त्यातून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. त्यात आतापर्यंत भाजपचे 150 कार्यकर्ते मारले गेले. भाजपने बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची बनविलेली आहे. ममतादीदींच्या अनेक निकटवर्तीयांना फोडून आपल्या गटात ओढणाऱया भाजपला ही निवडणूक तशी सोपी जाणारी नाही. देशातील एकमेव बलाढय़ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱया ममता बॅनर्जी या देखील कणखरपणे निवडणूक लढवित आहेत. ममता विरुद्ध मोदी-अमित शहा असाच हा लढा आहे. या दोन मोठय़ा पक्षांच्या लढतीत काँग्रेसचा बंगालमध्ये आवाज ऐकायला मिळणेच कठीण होऊन बसले आहे. एकेकाळी या काँग्रेसबरोबरच डाव्या आघाडीतील पक्षांनी अनेक वर्षे बंगालवर राज्य चालविले. हे पक्ष आज अस्तित्वासाठी लढाई करत आहेत. काँग्रेसचे मागील निवडणुकीत आमदार निवडून आले होते त्यातील सुमारे 50 टक्के आमदार हे भाजपच्या संपर्कात आले असल्याने काँग्रेस मोठय़ा अडचणींशी सामना करीत आहे. ममतांनी राज्यात भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन गेली काही वर्षे एक नंबरचा कट्टर शत्रू असलेल्या काँग्रेस पक्षाबरोबरही युती करण्याचे संकेत दिलेले आहेत. प. बंगालमध्ये भाजप विरोधी पक्षांमध्ये असलेल्या फुटीची साथ भाजपला मिळू नये, यासाठी ममता बॅनर्जी दररोज नव्या चाली खेळत आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या मुळांना हात घातला असल्याने बंगालमध्ये भाजप-तृणमूल यांच्यातील संघर्ष उफाळण्याची शक्यताच जास्त आहे. दक्षिणकडच्या तामीळनाडूच्या राजकारणात होत असलेले बदलही महत्त्वाचे वाटतात. सत्ताधारी अ. भा. अण्णा द्रमुक पक्षाने भाजपबरोबर युती केली आहे. आणि जयललिता यांच्या वारसदार ठरणाऱया त्यांची मैत्रिण शशिकला यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. शशिकला या स्वतंत्रपणे आपला पक्ष स्थापन करून निवडणून लढविणार या वृत्ताने मूठभर माज चढलेल्या व सत्तेची स्वप्ने पाहणाऱया द्रविड मुनेत्र कळगम पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्यासमोर काँग्रेस पक्षाशी युती केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. शशिकलांनी माघार घेतल्याने तामीळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली उत्कंठा संपली. सध्या देशातील बहुतेक मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात असल्याने प. बंगाल आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा आटापिटा दिसतो. हे एकमेव राज्य ताब्यात आल्यानंतर भाजपचे मुख्य उद्दिष्ट सफल होईल. ‘काँग्रेसमुक्त भारत’ साठीचा नारा लगावताना भाजप ‘सोनार बांगला’ अभियान घेऊन चालला आहे. त्यासाठी पक्ष सध्या ‘आयारामां’ ची भरती करून घेतो आहे. ते पाहता तृणमूल व काँग्रेसच्या अनेक डोक्यावर भगव्या पगडय़ा पहायला मिळतील. निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील नेते माकडउडय़ा मारतात व जनतेची करमणूक होते. पश्चिम बंगालमध्ये देखील हाच प्रकार चालू आहे. आता तिथे मतदारांचीच कसोटी आहे. हे नेमके सांगण्याची गरज नाही. 2 मे रोजी सारे काही स्पष्ट होईल.
Previous Articleआजचे भविष्य
Next Article भगवंत सेवा अन् व्यायामही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








