ओल्या कचऱयावर आता प्रकल्पात कोणती प्रक्रिया होते याकडे सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी / मडगाव
सोनसडा प्रक्रिया प्रकल्पातील शेडमध्ये पडून राहिलेला कित्येक टन कचरा पूर्णपणे हटविण्यात आला असून या प्रकल्पात ओल्या कचऱयावर कोणती प्रक्रिया राबविण्यात येते याकडे मडगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोमेन्तो कंपनीकडून मडगाव पालिकेने कचरा प्रकल्प पुन्हा हाती घेतल्यानंतर प्रकल्पातील शेडमध्ये पडून असलेल्या कचऱयाचे काय करायचे असा प्रश्न पडला होता. पंधरवडय़ापूर्वी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सोनसडा यार्डातील कचऱयावर बायोरेमेडिएशन प्रक्रिया करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला सदर कचरा शेडमधून हटवून त्यावर बायोमेथिनेशन प्रक्रिया करावी असे सांगितले होते. त्यानुसार कित्येक टन असलेला हा कचरा हटविण्यात आला आहे.
आता सोनसडा प्रकल्पात फोमेन्तोमार्फत राबविण्यात आलेली व्रिंडो पद्धती चालू ठेवून कचऱयावर प्रक्रिया केली जाणार की, प्रत्येकी दोन टन कचऱयावर प्रक्रिया करणारी 4 ते 5 बायोमेथिनेशन यंत्रे बसवून प्रक्रिया केली जाईल वा अन्य कोणत्याही अत्याधुनिक पद्धतीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या घडीला बायोमेथिनेशन प्रकल्प बसविणे योग्य ठरणार असल्याचा दावा करून फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी महाराष्ट्रात असे प्रकल्प हाताळणाऱया तज्ञाला पाचारण करून महिन्याभरापूर्वी सोनसडय़ाची पाहणी केली होती. या तज्ञाला घेऊन कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांची त्यांनी भेटही घेतली होती. तेव्हा महाराष्ट्रातील सदर बायोमेथिनेशन प्रकल्पांची पाहणी करण्याचे ठरविले होते. कोरोना विषाणूच्या फैलावानंतर या पाहणीसंदर्भात अजून तारीख निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.