महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
बोगस सैन्य भरती घोटाळयातील आरोपींना मदत करणाऱया पोलीस अधिकाऱयांना बडतर्फे करा. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीबीआयकडे वर्ग करा. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष युवराज शिंदे, राहूल पवार व पादाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गांधी जयंती दिवशी उपोषण केले.
भारतीय नौदल लष्कर तसेच अर्थसैनिक दलामध्ये भरतीचे आमिष दाखवून फलटण तालुक्यातील भाडळी येथील आकाश काशिनाथ डांगे, बारामती येथील नितीन जाधव यांनी महाराष्ट्रातील शेकडो युवकांची लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत भिगवन तालुका इंदापूर येथे दि. 20 जून रोजी गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षापासून या दोघांनी भारतीय संरक्षण दलात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करून देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकाश डांगे व नितीन जाधव यांच्या विरोधात फलटण शहर व ग्रामीण ठाण्यात अनेक युवकांनी आपल्या आर्थिक फसवणूक झाल्याबद्दल तक्रार अर्ज केले होते. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱयांनी आरोपी बरोबर संगनमत करून या दिलेल्या तक्रार अर्जाची परस्पर विल्हेवाट लावली आहे. या अधिकाऱयांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना करण्यात आली.








