अमेरिकेच्या अध्यक्षांचे पुन्हा स्पष्टीकरण, लोकांची स्थिती पाहून होते दुःख – सैन्य अखेर कधीपर्यंत तेथे थांबणार
अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीचा निर्णय योग्य होता. मोठय़ा संख्येतील लोकांना त्रास आणि नुकसान होता काबूलमधून बाहेर काढण्याची कुठलाच मार्ग नव्हता असे स्पष्टीकरण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी पुन्हा दिले आहे.
मनाला हादरवून सोडणारी दृश्ये दिसणारच होती. माझे मन देखील या लोकांना पाहून व्यथित होते. पण अखेर आम्ही आता अफगाणिस्तान सोडले नसते तर कधी सोडले असते हा प्रश्न उभा राहतो. सैन्याच्या माघारीचा माझा निर्णय तार्किक, तर्कसंगत आणि योग्य म्हणून नोंदविला जाणार असल्याचा दावा बायडेन यांनी केला आहे.
36 तासांत 11 हजारांना बाहेर काढले
अमेरिकेने 36 तासांमध्ये 11 हजार लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढल्याचे बायडेन यांनी सांगितले आहे, पण याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. या मोहिमेत अमेरिकेचे वायुदल आणि कंपन्यांच्या विमानांनाही सामील करण्यात आले आहे. अद्याप हजारो लोक एअरलिफ्टच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रक्रिया सुरक्षेची कारणे तसेच अमेरिकेच्या ब्युरोक्रेसीमुळे मंदावत आहे. अमेरिकेच्या सैन्याने काबूल विमानतळावरील सुरक्षित क्षेत्र वाढविले असून याकरता तालिबानने मदत केल्याचे बायडेन यांनी सांगितले आहे.
कुणावर विश्वास ठेवत नाही
तालिबानवर विश्वास ठेवता का असा प्रश्न बायडेन यांना विचारण्यात आला होता. मी कुणावरच विश्वास ठेवत नाही. तालिबानला तत्त्वांना धरून निर्णय घ्यायचा आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना एकजूट करून त्यांच्या भल्यासाठी तालिबान काम करणार का हा खरा सवाल आहे. हे 100 वर्षांमध्ये कुणालाच साध्य करता आलेले नाही. तालिबानला असे करता न आल्यास त्याला आर्थिक सहकार्य, व्यापार आणि अनेक गोष्टींमध्ये मदत घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
बचाव मोहीम
व्हाइट हाउसनुसार अमेरिकेच्या सैन्याच्या 8 फ्लाइट्सनी हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1,700 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. याचबरोबर अन्य 39 विमानांमधून 3,400 लोकांना घेऊन उड्डाण केले आहे. 14 ऑगस्टपासून अमेरिकेने 25,100 जणांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. जुलैच्या अखेरपासून आतापर्यंत सुमारे 30 हजार लोकांचे स्थलांतर केले गेले आहे.
दहशतवाद्यांकडून धोका
दहशतवादी या स्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतील आणि निष्पापांना किंवा अमेरिकेच्या सैन्याला लक्ष्य करतील हे आम्ही ओळखून आहोत. स्थितीवर आम्ही नजर ठेवून असून यामुळे कुठलाही धोका वेळीच ओळखून तो दूर करण्याचा प्रयत्न आहे. इस्लामिक स्टेटकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याचे बायडेन म्हणाले. लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची मुदत 31 ऑगस्टला संपत आहे. आम्ही सैन्यासोबत ही मुदत वाढविण्यासंबंधी चर्चा करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.









