वृत्तसंस्था/ जेरूसलेम
सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे इस्रायलसोबत भारताचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी रविवारी 5 दिवसीय दौऱयावर रवाना झाले आहेत. विदेशमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणसचिव अजय कुमार यांच्याकडून सामरिक संबंधांना बळ देण्याच्या पद्धती शोधण्यासाठी करण्यात आलेल्या इस्रायलच्या दौऱयांनंतर सैन्यप्रमुख ज्यू राष्ट्रात पोहोचले आहेत. ऑगस्टमध्ये तत्कालीन वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनीही इस्रायलचा दौरा केला होता.
सैन्यप्रमुख जनरल नरवणे हे इस्रायलच्या पाच दिवसीय दौऱयावर रवाना झाले आहेत. या दौऱयाचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान सामरिक संरक्षण सहकार्याला चालना देणे असल्याचे सैन्याने ट्विट करत सांगितले आहे. दोन्ही देशांदरम्यान समग्र सैन्य सहकार्याला चालना देण्यासाठी इस्रायलच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱयांसोबत जनरल नरवणे व्यापक चर्चा करणार असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.









