नागठाणे / प्रतिनिधी :
सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे अपशिंगे (मि.) हे गाव आमदार आदर्श ग्राम योजने अंतर्गत आमदार सदाभाऊ खोत यांनी दत्तक स्वरूपात घेतले होते. त्यावेळी विकासकामांतर्गत रणगाडय़ाची कल्पना सूचली होती. परंतु मागणी आणि रणगाडय़ांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारी तयारी वेळेत करता आली नाही. त्यामुळे अपूर्ण राहिलेली ग्रामस्थांची रणगाडय़ाची मागणी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर केली.
त्यानंतर बुधवारी 2 मार्च रोजी पुण्यातील खडकी येथून अपशिंगे (मि.) येथे कंटेनरमधून रणगाडय़ाचे आगमन झाले. रशियन बनावटीच्या टी-55 या मेन बेटल रणगाडय़ाचे स्वागत करण्याकरिता अबालवृद्ध, जवान आजी-माजी सैनिक, विविध संस्थाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. रणगाडय़ाची वाजतगाजत मराठी शाळेपासून असेंब्ली हॉलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नियोजित जागी चबुतरा बांधून त्याच्यावर तो रणगाडा ठेवण्यात आला. या रणगाडय़ामुळे सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱया अपशिंगे (मि.) गावच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.









