डीआरडीओचे हीटिंग उपकरण : उणे 40 अंश तापमानातही बंकर उबदार ठेवणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सियाचीन आणि लडाख यासारख्या हिमाच्छादित भागांमध्ये सीमेवर तैनात सैनिकांना खडतर संकटांवर मात करण्यास मदत करणारी सुविधा प्राप्त होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) सैनिकांसाठी ‘हिमतापक’ हीटिंग उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या मदतीने सैन्याचा बंकर उणे 40 अंश तापमानातही उबदार राहणार आहे. सैन्याने या उपकरणासाठी 420 कोटी रुपयांची ऑर्डर डीआरडीओला दिली आहे. हिमाच्छादित भागात लवकरच ही उपकरणे आयटीबीपी आणि सैन्याच्या चौक्यांमध्ये बसविण्यात येणार आहेत.
हे हीटिंग उपकरण बॅक ब्लास्टदरम्यान निघणारा विषाणू वायू कार्बन डायऑक्साइडपासून सैनिकांना वाचविणार आहे. या विषारी वायूमुळे सैनिकांचा मृत्यूही ओढवत असतो. एखाद्या सैनिकाने लाँचरला खांद्यावर किंवा जमिनीवर ठेवून अग्निबाण डागल्यास त्याच्या मागून विषारी वायू बाहेर पडतो. याच भागाला बॅक ब्लास्ट एरिया म्हटले जाते. हिमतापक या वायूला शोषून घेणार आहे.
हिमतापकाची वैशिष्टय़े..
-उपकरण सौरऊर्जा, विद्युत आणि केरोसीन या तिन्हीद्वारे संचालित होऊ शकते.
-याच्या मदतीने 20 चौरस मीटर क्षेत्रफळाचा बंकर तसेच तंबू उबदार राहणार.
-चार्जर कंट्रोल व्होल्टेजरला नियंत्रित करण्यासह पंखाही चालवू शकतो.
-पंखा उबदार हवा बंकर तसेच तंबूमध्ये फैलावत राहतो.
-उपकरणातून निळा प्रकाश बाहेर पडतो, तो प्राणवायूची पातळी कायम राखतो.
-बंकरमध्ये असलेल्या सैनिकांना श्वास घेण्यासही त्रास होणार नाही.
-आग लागण्याचा धोकाही राहणार नाही.
विशेष क्रीम तयार
डीआरडीआने ‘एलोकल क्रीम’ही तयार केली आहे. ही क्रीम फ्रॉस्ट बाइट (शीतदंश) आणि थंडीमुळे सैनिकांना होणारी ईजा बरी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. भारतीय सैन्याने दरवर्षासाठी 3 ते 3.5 लाख क्रीम्सची ऑर्डर दिली आहे. ही क्रीम पूर्व लडाख आणि सियाचीन सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाठविण्यात येणार असल्याचे वैज्ञानिक डॉ. राजीव वार्ष्णेय यांनी सांगितले आहे.
स्नो मेल्टर
डीआरडीओने याचबरोबर स्नो मेल्टर (बर्फ वितळविणारे उपकरण) तयार केला आहे. याच्या मदतीने लडाख आणि सियाचीन सीमेवर तैनात सैनिकांसाठी पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. हे उपकरण दर तासाला बर्फ वितळवून 5 ते 7 लिटर पिण्यायोग्य पाणी सैनिकांना पुरवू शकते.









