वृत्तसंस्था/ माहे, सेशेल्स
येथे झालेल्या सेशेल्स नॅशनल डे बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी चमकदार प्रदर्शन करीत सात पदके पटकावत अग्रस्थान मिळविले. त्यात 3 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
तीन सुवर्णपदकांसमवेत तीन रौप्य व एक कांस्यपदकही भारताने मिळवित पहिले स्थान मिळविले. मॉरिशसने सहा पदके जिंकत दुसरे स्थान मिळविले. हिमांशू शर्माला 50 किलो वजन गटात न लढताच सुवर्ण मिळाले. त्याच्या प्रतिस्पर्ध्याने त्याला पुढे चाल दिली तर आशिष मुदशानियाने 55 किलो गटात अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यावर 4-1 अशा फरकाने विजय मिळवित सुवर्ण घेतले. 90 किलोवरील गटात गौरव चौहानने अतिशय चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी मुष्टियोद्ध्यावर 3-2 असा निसटता विजय मिळवित भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले.
अनमोल (60 किलो गट), आदित्य यादव (65 किलो) व नीरज (75 किलो) यांना मात्र कठोर संघर्ष केल्यानंतरही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिघांनाही अंतिम लढतीत 2-3 अशा फरकानेच पराभव पत्करावा लागला. याशिवाय कार्तिक दलालनेही 70 किलो गटात कांस्य पटकावत आणखी एका पदकाची भर घातली.









