प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 मुळे नाभिक, परीट, विणकर यांसह कामगार अडचणीत आहेत. त्यांना सरकारने पाच हजार रुपये मदत निधी जाहीर केला आहे. त्यांच्या नावे तातडीने ती रक्कम जमा करावी, असा आदेश जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिला आहे.
सर्व कागदपत्रे दिल्यानंतर कोणीही जर जाणूनबुजून पैसे जमा करण्यास टाळाटाळ करत असेल तर संबंधितांवर कठोरातकठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये या सूचना करण्यात आल्या आहेत.
सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामुळे लिखित अर्ज स्वीकारू नये. केवळ जनतेच्या माहितीसाठी अर्जाचे नमुने त्यांना द्या. मात्र लिखित अर्ज कोणाकडूनही स्वीकारू नये, असे सांगण्यात आले. सरकारने या गरीब लोकांना निधी मंजूर केला आहे. मात्र विनाकारण विलंब केल्यास त्या अधिकाऱयावरच कारवाई केली जाईल.
या सर्वांनी 30 जूनपर्यंत सेवासिंधू ऍपच्या ऑनलाईन माध्यमातून हे अर्ज दाखल करायचे आहेत. संबंधितांनी जातीचा दाखला, याचबरोबर बीपीएल कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. कोणीही अधिकाऱयाने कामाच्या परवान्याचे कारण काढून त्यांची रक्कम थांबवू नका. संपूर्ण माहिती दिल्यानंतर तातडीने त्या कुटुंबीयांच्या एका व्यक्तीच्या नावावर ती रक्कम जमा करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी हडपद समाजाच्या तसेच इतर समाजाच्या नागरिकांनी निर्माण होणाऱया अडचणींबाबत माहिती दिली आहे.
आतापर्यंत 1226 नाभिक कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत तर 311 धोबी कुटुंबांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज दाखल केले आहेत. इतर कुटुबांनीही तातडीने अर्ज दाखल करावेत. 18 ते 65 वयोगटातीला एकाच्या नावे तसेच आधारलिंक असलेल्या बँक पासबुकवर ही रक्कम जमा करायची आहे. जनतेला अडचण आल्यास कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला महापालिका आयुक्त जगदीश के. एच., कामगार उपायुक्त वेंकटेश सिंद्धीहट्टी, साहाय्यक उपायुक्त डी. जी. नागेश, तरुणम मल्लिकार्जुन बोगर यांच्यासह विविध समाजाचे नागरिक उपस्थित होते.









