वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपनी सेल्सफोर्स भारतात येणाऱया काळामध्ये सुमारे 5 लाख जणांना रोजगार देण्याची तयारी करत असल्याचे समजते. भारत हा जीडीपीच्याबाबतीत अर्थव्यवस्थेत दुसरा मोठा देश बनू शकतो हे जाणून घेऊन भारतात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना सेल्सफोर्सकडून आखण्यात आली आहे.
तसं पाहता कंपनी भारतात 13 लाख जणांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार देण्याचा विचार करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्यक्ष रूपामध्ये कंपनी 5 लाख 48 हजार जणांना रोजगार देणार आहे. या कंपनीचे सध्याचे बाजारी मूल्य अंदाजे 240 अब्ज डॉलर्सचे असल्याचे समजते. पुढील एक-दोन वर्षांमध्ये भारतात 2 लाख 50 हजार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंतर्गत त्यांना रोजगारक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
सेल्सफोर्सचा परिचय
3 फेब्रुवारी 1999 मध्ये या कंपनीची स्थापना ओरॅकलचे माजी कार्यकारी मार्क बेनॉफ यांनी सहकाऱयांच्या मदतीने केली असून मुख्य कार्यालय सॅनफ्रान्सीस्को, कॅलिफोर्निया येथे आहे. क्लाऊड आधारीत सॉफ्टवेअर क्षेत्रात कंपनी कार्यरत असून फॉर्च्युनच्या 2020 च्या 100 कंपन्यांच्या यादीत या कंपनीचे स्थान सहावे आहे. 26 सप्टेंबर 2005 ला भारतात बेंगळूर येथे शाखा सुरू केली.