स्वित्झर्लंडमधून कृपा सामंत यांनी सांगितले तेथील वास्तव : स्वत:ला सुरक्षित ठेवून समाजाची मदत
मनोज चव्हाण / मालवण:
मागील महिनाभरात आम्ही घराबाहेर पडलेलो नाही वा कुणी घरी आलेले नाही. आवश्यक वस्तू ऑनलाईन खरेदीने उपलब्ध होतात. वस्तू घरात आल्यावरही 24 तासांनी वा साबणाने धुऊन वापरणे सुरू झाले आहे. सर्व शाळा व इतर संस्था पालकांशी, विद्यार्थ्यांशी ई-मेल, पत्र, फोन कॉल, व्हीडिओ कॉलने संपर्कात आहेत. मुलांना घरी गुंतवण्यासाठी वर्कशिट, होमवर्क दिले गेले आहे. म्युझिक डान्स स्कूलमधील शिक्षक मुलांसाठी यू टय़ुबच्या माध्यमातून व्हीडिओ अपलोड करून संपर्कात राहत आहेत. आज घराची बाल्कनी आणि खिडकी एवढेच बाहेरचे जग प्रत्यक्ष पाहण्याची जागा झाल्या आहेत. परंतु स्वत:ला सुरक्षित ठेवूनच आपण समाजाची मदत करू शकतो, हीच यामागची प्रेरणा आहे, अशा शब्दात स्वित्झर्लंड देशात राहणाऱया सौ. कृपा नीलेश सामंत परुळेकर यांनी सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. येथील आर. के. कन्स्ट्रक्शनचे लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी कृपा यांच्याशी संपर्क साधून दिला.
कृपा पुढे म्हणाल्या, ‘या कठीण परिस्थितीतही हा देश गडबडून न जाता कार्यक्षमपणे या आपत्तीशी सामना करीत आहे. आम्हीही काटेकोरपणे नियमांचे पालन करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहोत.’ कृपा हय़ा पती नीलेश प्रफुल्ल परुळेकर आणि मुलगी मृण्मयी (5) यांच्यासमवेत दोन वर्षांपासून स्वित्झर्लंडमधील बासेल शहरात वास्तव्यास आहेत. नीलेश हे इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत. कृपा आणि नीलेश हे दोघेही मालवण शहरातील मूळ रहिवासी आहेत.
अनेक मोठे कार्यक्रम रद्द
स्वित्झर्लंड हा केवळ 8.57 मिलीयन लोकसंख्येचा, महाराष्ट्राहूनही कमी क्षेत्रफळाचा मध्य युरोपमधील एक छोटा, सुंदर आणि अतिशय संपन्न देश आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात स्विस, इटली सीमेवरील कॅन्टोन टिसीनोमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून आजपर्यंत 25 हजाराच्यावर लोकांना लागण होऊन मृतसंख्या 907 पर्यंत पोहोचली आहे. साधारण 12 हजार लोक आजारातून बरे झाले आहेत. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हा कार्निवलसाठी जगप्रसिद्ध असून तेव्हा इथे सार्वजनिक सुट्टी असते. गेल्या 100 वर्षांत प्रथमच हे कार्निवल केवळ एक दिवस आधी कोरोनामुळे रद्द करण्यात आले. तेव्हापासून शाळा, ऑफिसेसही बंद करून जागृतीसाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू करण्यात आले. बासेल वर्ल्ड, मोटार शो इ. नामांकित इव्हेंट रद्द केले गेले. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू असला, तरी त्याचा वापर टाळावा, असेही सांगण्यात आले. सोशल गॅदरिंग बंद करण्याचे आवाहनही केले गेले. कोरोनाची जास्त लागण झालेल्या भागामध्ये मदतीसाठी मिलिटरी फोर्सना सामील करून घेण्यात आले. अत्यावश्यक वस्तू व औषधे वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली.
ऑनलाईन पोर्टलद्वारे उपचार
या काळात नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी, असा शासनाचा कल दिसतो. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱयांसाठी पोलीस फोर्सची मदत घेतली जात आहे. सेल्फ आयसोलेशन (स्वयं अलगीकरण) चा नियम मोडल्यास मोठा दंड ठोठावण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी काळजी घेतली जात आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार हेल्थ केअर सिस्टीमवर ताण आहे. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास मदतीसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे. आपल्याला होणाऱया संबंधित त्रासाची माहिती देऊन लगेच होम क्वारंटाईन करावे, असे सांगण्यात आले आहे. नोंद केलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट होत नाही. मर्यादित उपलब्धतेमुळे वृद्ध व रिस्क कॅटॅगरीमधील रुग्णांसाठी प्राधान्याने ही चाचणी केली जाते. इतरांनी सेल्फ आयसोलेशन करून व स्वत: रोगप्रतिकारशक्तीनेच आजाराचा सामना करणे अपेक्षित आहे.
दैनंदिनी पूर्णपणे बदलली
मागील महिन्याभरात आमची दैनंदिनी पूर्णपणे बदलून गेली आहे. संयम आणि स्वयंशिस्तीने या आपत्तीशी आपण सामना करू शकतो. कधीकधी खूप मोठय़ा संकटाचा सामना करण्याचा उपाय साधा सोपा आणि म्हणूनच ते न करण्याचा मोह पाडणारा असतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व आजारी लोक, आपले शेजारी, नातेवाईक, गावातील लोक व पर्यायाने आपला देश यांच्याप्रती आपली जबाबदारी केवळ हा मोह ओळखून व टाळूनच पार पाडता येईल. फक्त शासन, पोलिसांवर अवलंबून न राहता प्रत्येकाला ती पार पाडावी लागेल. तरच आपण पूर्णपणे या लढाईत यशस्वी होऊ, असेही सौ. कृपा म्हणाल्या.
भारताबाबत अभिमानास्पद चित्र!
स्वित्झर्लंडमध्ये कोरोना आजार पसरू लागल्यापासून भारतातील संबंधित बातम्यांवर आम्ही लक्ष ठेवून होतो. आतापर्यंत भारताने सावध आणि त्वरित निर्णय घेऊन कोरोना प्रसार थोपवून धरला आहे. बलाढय़ आणि प्रगत राष्ट्रे कोरानाच्या संकट समयी भारताकडून मदतीची अपेक्षा करीत आहे आणि आपला देश सक्षमपणे या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱया पार पाडत आहे, हे अतिशय सकारात्मक आणि अभिमानास्पद चित्र आहे. आपल्या सिंधुदुर्गातही जिल्हा रुग्णालयातून एकमेव रुग्ण बरा होऊन बाहेर पडल्याची बातमी खरेच कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्गात या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ज्या प्रकारे शासन, पोलीस आणि नागरिक कार्यरत आहेत, ते ऐकून आपण यशस्वीपणे यामधून बाहेर येऊ, असे वाटते, असेही प़ृपा आणि नीलेश यांनी सांगितले.









