जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथील दुर्घटना
वार्ताहर / रामनगर
जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथे सेल्फी काढण्याच्या नादात ब्रिजवरून खाली पडून युवक-युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गणेशगुडी हे एक प्रेक्षणीय स्थळ असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटक भेट देतात. सोमवारी बिदर येथून आलेले युवक व युवती ब्रिजवर सेल्फी काढत असताना अचानक त्यातील युवतीचा तोल जाऊन खाली पडली. तिला वाचविण्याच्या नादात दुसरा युवक खाली पडला. सदर घटना दुपारी 3 च्या दरम्यान घडली आहे. पुरुषोत्तम पाटील (वय 22 रा. बिदर) रक्षिता चिद्रीमनी (वय 20 रा. बिदर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिदर येथून दोन विद्यार्थी दांडेली येथे फिरण्यासाठी आले होते. तेथून ते रिक्षाद्वारे गणेशगुडी भागात फिरत असल्याचे सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना निदर्शनास आले. युवक-युवती ब्रिजवरून पडताना काही जणांनी दुपारी 3 च्या दरम्यान पाहिले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांचे मृतदेह हाती न मिळाल्याने मंगळवारी पहाटेपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर सकाळी 9.15 च्या दरम्यान ब्रिजखाली सदर मृतदेह आढळून आले. रक्षिता हिचा मोबाईल ब्रिजवरच पडल्याने तिच्या कुटुंबीयांना संपर्क साधण्यात आला आहे. तर पुरुषोत्तमच्या घरच्यांना मंगळवारी कळविण्यात आले. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.









