वृत्तसंस्था/ पॅरमा
डब्ल्यूटीए टूरवरील इटलीतील पॅरमा येथे सुरू झालेल्या इमिलिया रोमागेना महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉप सीडेड सेरेना विल्यम्सने एकेरीत विजयी सलामी देताना इटलीच्या पिगाटोचा पराभव केला पण सेरेनाची मोठी बहीण व्हीनसला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेवेळी प्रचंड वारे वाहत असल्याने खेळाडूंना झगडावे लागले.
सोमवारी झालेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सेरेना विल्यम्सने इटलीच्या पिगाटोच्या 6-3, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. 39 वर्षीय सेरेना महिलांच्या ताज्या मानांकन यादीत आठव्या स्थानावर आहे. सेरेनाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.
पहिल्या फेरीतील दुसऱया एका सामन्यात स्किमेडोव्हाने अमेरिकेच्या 40 वर्षीय वयस्कर व्हीनस विल्यम्सचा 5-7, 6-2, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. वादळी वारा सुरू झाल्याने आपल्याला हा सामना गमवावा लागला. परमेश्वराच्या या नैसर्गिक कृतीला आपण रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्हीनसने या सामन्यानंतर केली.









