फिफा या जागतिक फुटबॉल कार्यकारिणीने आगामी कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सेमी-ऑटोमेटेड ऑफसाईड टेक्नॉलॉजीचा अवलंब करणार असल्याची घोषणा केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व्हीडिओ मॅच पदाधिकारी ऑन फिल्ड ऑफिशियल्सना ऑफसाईडबाबत बिनचूक निवाडा करु शकणार आहेत. फुटबॉलमध्ये ऑफसाईडवरुन होणारे वाद कायमचे निकालात काढण्यासाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त ठरु शकते. कशी असेल ही टेक्नॉलॉजी व काय असतील याचे फायदे, यावर हा एक छोटासा प्रकाशझोत!

ऑफसाईड टेक्नॉलॉजीची आवश्यकता का भासली?
यापूर्वी 2018 मध्ये रशियन भूमीत संपन्न झालेल्या 2018 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत व्हीडीओ असिस्टंट रेफ्री (व्हीएआर) तंत्राचा यशस्वी अवलंब करुन घेण्यात आला होता आणि त्याचा उल्लेख करत फिफा अध्यक्ष जियानी इन्फेन्टिनो यांनी व्हीएआरची सुधारित आवृत्ती कतार विश्वचषकात अवलंबली जाईल, असे जाहीर केले होते. यंदा दाखल केली जात असलेली ऑफसाईड टेक्नॉलॉजी हा त्याचाच एक भाग आहे.
नवी प्रणाली उभे करण्याचे श्रेय कोणाला?
फिफाने आदिदास व इनोवेशन एक्सेलन्स आणि टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स वर्किंग ग्रूपच्या संयुक्त विद्यमाने व्हीएआर प्रणालीत नव्या सुधारणा घडवून आणण्यात आल्या. या सुधारणांमध्ये सेमी ऑटोमेटेड ऑफसाईड टेक्नॉलॉजीचा देखील समावेश आहे.
सेमी ऑटोमेटेड ऑफसाईड टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करेल?

स्टेडियमच्या छताला लावण्यात आलेले 12 अत्याधुनिक कॅमेरे चेंडू व खेळाडूंना ट्रक करतील. सामन्यादरम्यान ते खेळाडूची करेक्ट पोझिशन अगदी प्रत्येक सेकंदाला 50 वेळा कॅल्क्युलेट करणार आहेत. खेळाडूंच्या ज्या बॉडीपार्टमुळे अधिक ऑफसाईड होतात, त्यावर येथे ट्रक ठेवला जाणार आहे.
चेंडूमध्ये लावण्यात आलेला सेन्सर कसा मदत करणार?
वर्ल्डकपच्या ऑफिशियल चेंडूमध्ये अनोखा सेन्सर लावण्यात आला असून त्या माध्यमातून ऑफसाईड इन्सिडेन्ट्सची माहिती घेणे अधिक सोपे होणार आहे. सदर सेन्सर चेंडूच्या अगदी मधोमध लावण्यात आला असून तो व्हीडिओ ऑपरेशन रुममध्ये प्रतिसेकंद 500 वेळा डाटा पाठवणार आहे. यामुळे कीक पॉईंटची अचूक माहिती मिळू शकणार आहे.
ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचणार का?
व्हीडिओ मॅच ऑफिशियल आणि रेफ्रीद्वारा निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सदर डाटाचे थ्रीडी ऍनिमेशन जनरेट होणार असून त्यात ऑफसाईड झालेले असताना खेळाडू नेमक्या कोणत्या पोझिशनवर होता, हे स्पष्ट होणार आहे. ते ऍनिमेशन त्यानंतर स्टेडियमच्या मोठय़ा स्क्रीनवर देखील दाखवले जाणार आहे. त्यामुळे, ही सर्व माहिती अगदी चाहत्यांपर्यंतही पोहोचणार आहे.
मैदानावरील रेफ्रींना याची माहिती कशी मिळणार?
सामन्यादरम्यान व्हीडिओ ऑपरेशन रुममध्ये हजर ऑफिशियलना ऑटोमेटेड ऍलर्ट पाठवणार असून ऑफिशियल रेफ्रींना सूचित करण्यापूर्वी याची मॅन्युअली पाहणी केली जाईल. ही प्रक्रिया केवळ काही सेकंदात पार पडणार असून यामुळे यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकात ऑफसाईडचे नियम अगदी बिनचूक घेतले जाणार आहेत.
या टेक्नॉलॉजीचा प्रयोग यापूर्वी झाला आहे का?
फिफा अरब कप 2021 व फिफा क्लब वर्ल्डकप 2021 मध्ये या टेक्नॉलॉजीचा अवलंब केला गेला असून स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये सदर ऑफसाईड टेक्नॉलॉजीच्या नव्या प्रणालीचा अवलंब करत ऑफसाईडचे अतिशय बिनचूक निर्णय देण्यात आले आहेत. साहजिकच, कतारमधील फिफाला यंदा ऑफसाईड वादाची एकही घटना होणार नाही, असा विश्वास आहे.









