लसीच्या बातमीचा परिणाम : सेन्सेक्समध्ये 314 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना लसीच्या सकारात्मक बातमीने मंगळवारी शेअर बाजारात निर्देशांकांनी नव्या उच्चांकी पातळीवर पोहचण्यात यश मिळवलं आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 43 हजार 952 अंकांची पातळी पार करू शकला आहे.
मंगळवारी दिवसभर शेअरबाजारात तेजीचा माहोल दिसला होता. सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 314 अंकांच्या वाढीसह 43,952.71 वर तर निफ्टीचा निर्देशांक 93.95 अंकांच्या तेजीसह 12,874.20 वर बंद झाला. बँकिंग आणि धातु क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी तेजी दर्शवली. पण आयटी कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. मंगळवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स 457 अंकांच्या वाढीसह 44 हजार 95.85 अंकांवर आणि निफ्टी 152 अंकांच्या वाढीसह 12 हजार 932.50 अंकांवर खुला झाला. कोरोनाच्या आणखी एका लसीची यशस्वी चाचणी झाल्याची बातमी शेअर बाजारात तेजी आणण्यास कारणीभूत ठरली. सुरूवातीच्या सत्रात तर सेन्सेक्सने 44,161.16 व निफ्टीने 12,934.05 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. बीएसईतील लिस्टेट कंपन्यांचे बाजार भांडवल 170 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते.
निफ्टीत टाटा मोटर्सच्या समभागांनी दमदार कामगिरी नोंदवली असून 6 टक्के इतके समभागाचे भाव वाढले. टाटा स्टील आणि एचडीएफसी लाइफ यांच्या समभागांनीदेखील 5 टक्क्यांची वाढ दर्शवली. दुसरीकडे बीपीसीएलचे समभाग 4 टक्के नुकसानीसह बंद झाले. हिरो मोटोकॉर्प व एनटीपीसीचे समभाग 2 टक्के घसरले. गेल्या 11 दिवसात बाजार भांडवल 13 लाख कोटींनी वाढले आहे. नेदरलँडमधील आपला व्यवसाय टाटा स्टील स्वीडनमधील एसएसएबीला विकणार आहे. यामुळे टाटाचे समभाग वधारल्याचे बोलले जात आहे. सोमवारी अमेरिकेतील बाजार तेजीसह उच्चांकी स्तरावर बंद झाले होते. आशियाई बाजारांनीही मंगळवारी तेजी दाखवली होती. सेन्सेक्समधील 30 मधील 19 समभाग तेजीसह बंद झाले.









