बजाज ऑटो नुकसानीत – सेन्सेक्स 183 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्समध्ये 183 अंकांची घसरण झाली. मजबूत निर्देशांक ठेवणाऱया मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग शुक्रवारी नुकसानीत राहिले होते. दिवसअखेर सेन्सेक्स 182.75 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,386.19 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 38.10 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 15,689.80 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
सेन्सेक्समध्ये जवळपास दोन टक्क्यांनी बजाज ऑटोचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले. यामध्ये टीसीएस, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टेक महिंद्रा यांचा समावेश राहिला आहे. दुसऱया बाजूला टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल आणि एनटीपीसीसह अन्य समभाग लाभात राहिले आहेत.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारच्या सत्रात आर्थिक समभागातील नफावसुली कायम राहिल्याने देशातील बाजारात घरसणीचे वातावरण राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने धातू, औषध आणि रियल्टी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले होते. परंतु टीसीएसच्या उत्पन्न संदर्भातील अहवाल सादरीकरणामुळे आयटी निर्देशांकात नरमाईचा कल राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मध्यम आणि लहान कंपन्यांच्या(मिडकॅप आणि स्मॉलकॅप) समभागात लिलाव झाल्याच्या कारणास्तव कमाईच्या संकेतामुळे सुधारणात्मक स्थितीने गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत. यासोबतच विविध राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता मिळत असल्यामुळे व्यापारात येत असणाऱया तेजीने भांडवली बाजारात वेगळा कल निर्माण होणार असल्याचा अंदाज विविध अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.








