अखेर घसरणीला विराम – ओएनजीसीचे समभाग 6 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी मोठी घसरण नोंदवत बीएसई निर्देशांक 50 हजारांच्या खाली राहिला आहे. परंतु दुसऱया दिवशी मंगळवारी मात्र चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स व निफ्टीत तेजीची झुळूक राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारादरम्यान 667.46 अंकांवर चढउतार दिसून आला.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 7.09 टक्क्यांनी वधारुन 49,751.41 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,707.80 वर बंद झाला आहे. ही स्थिती जागतिक बाजारांमधून मिळत असलेल्या उत्साही वातावरणामुळे निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्समधील ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्यांनी लाभात राहिले आहेत. यासोबतच इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, स्टेट बँक आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र कोटक बँक, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारांमध्ये मजबुती कायम राहिली आहे. परंतु आशियातील काही बाजारांपैकी शांघाय आणि सोल हे घसरणीसह बंद झाले. तर हाँगकाँगमधील बाजारात तेजी राहिली. याचदरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव हा 0.81 टक्क्यांनी वधारला होता.
प्रमुख क्षेत्रांची मजल
मंगळवारच्या सत्रात समभाग विक्रीमध्ये चढउताराचे वातावरण राहिले होते, यामध्ये प्रामुख्याने धातू आणि रियाल्टी समूहातील निर्देशांकांनी चांगली मजल मारली होती. गुंतवणूकदारांनी मागील काही दिवसांमध्ये समभाग विक्री केल्यामुळे शेअर बाजारात घसरण सत्र राहिले होते. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावामुळे बाजार पुन्हा एकदा सावरला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.








