जागतिक पातळीवरील वातावरणाचा प्रभाव – सेन्सेक्स 28 टक्क्यांनी सावरला
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या वातावरणामुळे चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी काही प्रमाणात तेजी नोंदवत बंद झाले आहेत. यामध्ये देशातील कोरोना संसर्ग वाढण्याची काळजी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणासह व्यापारामधील घडामोडींचाही प्रभाव भारतीय शेअर बाजारावर कायम राहिला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागाच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 28.35 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 48,832.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 36.40 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 14,617.85 वर स्थिरावल्याची नेंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी शुक्रवारी एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, सन फार्मा, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र तेजीमध्ये बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र दिवसभरातील कामगिरीमध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, लार्सन ऍण्ड टुब्रो, टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
प्रमुख घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवरील घटनांचा परिणाम हा सकारात्मक राहिला होता. यासोबतच जगाच्या तुलनेत देशातील कोरोनाची दुसरी लाट अधिक चिंताजनक बनत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये एका दिवसात दोन लाखांपेक्षा अधिक कोरोना बांधित रुग्ण सापडत असल्याने याचा प्रभाव अर्थव्यवस्थेसह व्यापार क्षेत्रावर होत असल्याने गुंतवणूकदार काळजीत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
देशात सरकार लसीकरण वेगात करण्याचा प्रयत्न करीत असुन महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे याचा काहीसा नकारात्मक प्रभाव शेअर बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे. ही कोरोनाची वाढ अशीच सुरु राहिली तर ही बाब भविष्यातील शेअर बाजाराच्या वाटचालीसाठी धोकादायक राहणार असल्याचेही काही तज्ञांनी म्हटले आहे. अन्य शेअर बाजारामध्ये आशियातील चीनचा शांघाय कम्पेजिट, हाँगकाँगचा हँगसेग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे बाजार तेजीसह बंद झाले आहेत.









