सहावे सत्र नुकसानीत ः जागतिक स्तरावर मिळताजुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम सत्र व सलगचे सहावे सत्र शुक्रवारी घसरणीसह बंद झाले आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये चढउताराचा कल निर्माण होत सेन्सेक्सचा निर्देशांक 135 अंकांवर प्रभावीत झाला होता. दुसऱया बाजूला जागतिक पातळीवर मिळताजुळता कल निर्माण होत विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी आपली विक्री चालू ठेवल्याचा फटकाही बाजाराला बसल्याचे दिसून आले. यासोबत कच्च्या तेलाचे भाव तेजीत राहिल्यानेही बाजारात निराशा निर्माण झाली होती.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 135.37 अंकांनी घसरुन निर्देशांक 51,360.42 वर बंद झाला आहे. व्यवहारादरम्यान काही वेळ सेन्सेक्स तब्बल 574.57 अंकांनी नुकसानीत राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 67.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,293.50 वर बंद झाला आहे.
कोणते समभाग तेजीत, नुकसानीत?
शुक्रवारच्या सत्रात टायटन, विप्रो, डॉ.रेड्डीज लॅब, एशियन पेन्ट्स, सनफार्मा, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे मुख्य समभाग नुकसानीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
आशियातील अन्य बाजारापैकी जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नुकसानीत तर हाँगकाँगचा हँगसेंग व चीनचा शांघाय याचा निर्देशांक तेजीत राहिला आहे. शुक्रवारी प्रामुख्याने भारतीय बाजाराला प्रभावीत करणाऱया घटनांमध्ये जागतिक पातळीवरील व्याजदर वाढ व त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेचा फटका हा बहुतांश शेअर बाजारांना बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.96 टक्क्यांनी वधारुन 120.96 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.









