सेन्सेक्स 91.84 अंकांनी वधारला : टीसीएसचे मजबूतीमध्ये
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही सत्रांमध्ये भारतीय भांडवली बाजाराने काही प्रमाणातील घसरणीचा काळ सोडला तर भांडवली बाजाराचा तेजीचा प्रवास हा कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दररोजन नवनवीन विक्रमाची मालिका प्राप्त करत शेअर बाजारची घोडदौड सुरु असल्याचे दिसून येत आहे.
चालू आठवडय़ात बाजारात तेजीचा माहोल सुरु असून यामध्ये डिसेंबर तिमाहीच्या नफा कमाईचे आकडे सादर होत असल्याचा आधार घेत गुंतवणूकदारांचा कल गुंतवणुकीकडे राहिल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सेन्सेक्स 50 हजाराकडे तर निफ्टीचा आकडा 15 हजाराकडे वाटचाल करीत आहे.
भारतीय शेअर बाजारातील चौथ्या दिवशी गुरुवारी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यासारख्या कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने 92 अंकांवर झेप घेत नवा विक्रम प्राप्त केला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 91.84 अंकांनी वधारुन 49,584.16 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 30.75 अंकांच्या मजबुतीसह 14,595.60 वर नवा विक्रम नोंदवत स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये टीसीएसचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्मा यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
देशातील बाजार प्रामुख्याने एफएमसीजी आणि औषध कंपन्यांचे समभागाच्या कामगिरीमुळे बाजार निच्चांकी पातळीवरुन उभारत बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे तेजीसह बंद झाले आहेत. चीनमधील शांघाय कम्पोजिटमध्ये घसरण राहिली आहे. तसेच युरोपीय बाजार लाभात होते. याच दरम्यान जागतिक बेंचमार्क ब्रेट कच्चे तेल 0.12 टक्क्यांनी नुकसानीमुळे 55.99 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.








