जागतिक बाजार मजबूत ः माहिती तंत्रज्ञान, धातूचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजार दमदार तेजीसह बंद झाला. जागतिक बाजारांमधील मजबूत स्थिती आणि माहिती तंत्रज्ञान, धातू व आर्थिक समभागांमधील झालेल्या लिलावामुळे बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाने नवी उंची प्राप्त करत नवा विक्रम नेंदवला आहे. यासोबतच बीएसई व एनएसई निर्देशांक दोन टक्क्यांची तेजी नोंदवत बंद झाले आहेत.
व्यापाऱयांनी सांगितले आहे, की अमेरिकेमधील महागाईचे आकडे कमी येण्याच्या अंदाजामुळे बाजाराला सकारात्मक सोबत मिळाली आहे. यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी मजबूत झाला तसेच विदेशी भांडवलाच्या प्रवाहामुळे बाजाराची स्थिती मजबूत राहिल्याची माहिती आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकही व्याजदर वाढीची गती कमी करत असल्याचे वातावरण आहे याही घटनेचा लाभ देशातील बाजाराला झाला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 1,181.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 61,795.04 वर बंद झाला आहे. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 321.50 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 18,349.70 वर बंद झाला. दिवसभरात एकावेळी सेन्सेक्सने 61,840.97 च्या उच्चांकावर तर 61,311.02 अंकांचा नीच्चांक नोंदवला होता.
सेन्सेक्समध्ये एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे 5.84 टक्क्यांनी तेजीत राहिले. यासह एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, स्टेट बँक, कोटक बँक, डॉ.रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
देशातील बाजारांनी जागतिक पातळीवरील कलानुसार आपली कामगिरी केल्याने जगभरातील बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिले.









