सेन्सेक्स 284.01 अंकांनी वधारला : जागतिक संकेताचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारातील तेजीचा प्रवास हा मागील तीन सत्रात कायम राहिल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये मागील आठवडा आणि चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी तेजीची बीएसई सेन्सेक्सची घोडदौड कायम राहिली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बुधवारी सेन्सेक्सने 284.01 अंकांची तेजी प्राप्त करत दिवसअखेर निर्देशांक 34,109.54 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 82.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,061.55 वर बंद झाला.
बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स 359.88 अंकांनी आणि निफ्टीने 129.2 अंकांच्या वाढीसोबत आपला प्रारंभ केला होता. तसेच दिवसभरात टेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्स 663.16 अंकांनी आणि निफ्टी 180.25 अंकांची साधारण तेजी प्राप्त करण्यात यश मिळवले होते.
जागतिक संकेतामुळे एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. सोबत कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, स्टेट बँक आणि ओएनजीसी यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले आहेत.
विदेशी कोषाचा सुरु राहणारा प्रवाह आणि जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे देशातील शेअर बाजारांची कामगिरी समाधानकारक होत असल्याचे पहावयास मिळत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे. कारण कोविडच्या संकटात अशा कामगिरीचा प्रवास कायम राखणे कठीण असल्याचेही यावेळी तज्ञांनी म्हटले आहे.








