चिपळुणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला ललकारले
प्रतिनिधी/ चिपळूण
माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, मी काय साधा माणूस वाटलो का, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी आपला संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमकतेला आपण जुमानत नाही, आम्ही डबल आक्रमक आहोत, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला ललकारले.
जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने सोमवारी रात्री येथे आलेल्या राणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. महाड येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा. मी काय साधा माणूस वाटलो का, अशी विचारणा त्यांनी पत्रकारांना केली.
नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर ते म्हणाले, आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचे वक्तव्य केले होते तेव्हा तो गुन्हा नव्हता का, मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल करतानाच देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणे हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे. काय चेष्टा लावली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिवसेनेकडून टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते, त्यांनी समोर उभे तरी रहावे. पोलिसांनी पत्र दिले नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे, मी जे बोललो तो गुन्हा नाही. पुन्हा तपासून पहावे, असे यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले. पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचे पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहुया. जनआशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहुया, असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.
यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार नीलेश राणे, प्रमोद जठार, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार शाम सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर आदी उपस्थित होते.









