ऑनलाईन टीम / नांदेड :
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला खिंडार पाडत माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे साबणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघातील विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यासाठी येत्या 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱयावर आहेत. या दौऱयात साबणे यांनी नरसी नायगावमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज भाजपने या पोटनिवडणुकीसाठी साबणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे साबणे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.