प्रतिनिधी / सेनापती कापशी
कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील ४७ वर्षीय प्रतिथयश खाजगी डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाल्याने संपूर्ण चिकोत्रा खोऱ्यावर चिंतेचे सावट पसरले आहेत. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच सेनापती कापशी अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन आठवड्यापुर्वी त्याना कोरोना संसर्ग झाला होता. कोरोना काळातही या डॉक्टरनी व्यावसायाशी निष्ठा ठेवत व प्रामाणिक राहात जीवाची पर्वा न करता, सेनापती कापशी परिसरातील २०- २५ गावातील गरीब, गरजू आणि सामान्य रुग्णांची बिनधास्त २४ तास सेवा केली. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी शासनाच्या आदेश धुडकावत खाजगी रुग्णालये बंद ठेवली आहेत. मात्र या पती -पत्नीने आपला दवाखाना सुरु ठेवून २४ तास रुग्णांना तत्पर सेवा दिली. सेवा करता-करता १४ दिवसापूर्वी त्यांना त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांनी स्वॅब दिल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
निपाणी येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर सुरवातीला उपचार सुरू झाले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ४ दिवसापूर्वी बेळगाव खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसापूर्वी प्रकृती अधिकच गंभीर झाली. आणि आज पहाटे त्यांच्या मृत्यू झाला. शांत, संयमी, मितभाषी, प्रेमळ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू होण्याची सेनापती कापशी परिसरातील पहिलीच घटना आहे.
बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात कोरोनाशी या तरुण डॉक्टराची मृत्यूशी झूंज सुरु होती. तेथील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण अखेर त्यांची आज पहाटे प्राणज्योत मावळली. कोरोनामुळे डॉक्टरांचाच मृत्यू झाल्याने जनतेत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, भाऊ, भावजय, मुले असा परिवार आहे.
Previous Article…..आणि सातारा-कोरेगाव रस्त्याचे रिक्षा चालकांनी भरले खड्डे
Next Article एनसीबीकडून दीपिका पादुकोण, सारा अली खान यांना समन्स







