विजय हजारे करंडक क्रिकेट – रवि चौहान, प्रेरक मंकड यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ जयपूर
सेनादलाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत केरळचा 7 गडय़ांनी पराभव करून विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सौराष्ट्रनेही विदर्भचा याच फरकाने पराभव करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.
176 या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सेनादलाने 30.5 षटकांतच 3 गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. सलामीवीर रवी चौहानने 13 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 90 चेंडूत 95 धावा फटकावल्या (47 चेंडूत अर्धशतक) तर कर्णधार रजत पलिवालने 86 चेंडूत नाबाद 65 धावा जमविल्या. पलिवालने नाणेफेक जिंकून केरळला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवित केरळला 40.4 षटकांत 175 धावांत गुंडाळले. मध्यमगती गोलंदाज दिवेश पठाणियाने 19 धावांत 3 बळी मिळविले केरळच्या आघाडी फळीला खिंडार पाडले. नंतर पुलकित नारंग, अभिषेक तिवारी यांनी प्रत्येकी 2 व राहुल सिंगने एक बळी मिळविला. सेनादलाचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. केरळतर्फे सर्वाधिक 85 धावा करणाऱया रोहन कुन्नुम्मलला त्यांनी धावचीत केले. रोहनने 106 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार मारले. याशिवाय विनूप मनोहरनने 54 चेंडूत 41 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक ः केरळ 40.4 षटकांत सर्व बाद 175 ः रोहन कुन्नुम्मल 85, विनूप मनोहरन 41, दिवेश पठाणिया 3-19, अभिषेक तिवारी 2-33, पुलकित नारंग 2-51), पराभूत विरुद्ध सेनादल 30.5 षटकांत 3 बाद 176 ः रवी चौहान 95, रजत पलिवाल नाबाद 65, उन्नीकृष्णन मनुकृष्णन 2-23).
सौराष्ट्रची विदर्भवर मात
जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने विदर्भवर सात गडय़ांनी मात करीत अंतिम फेरी गाठली. जयदेव उनादकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी विदर्भचा डाव 40.3 षटकांत 150 धावांत गुंडाळला, त्यानंतर 20.1 षटकांत सौराष्ट्रने 3 गडी गमवित विजय साकार केला. आघाडी फळी लवकर बाद झाल्यानंतर प्रेरक मंकडने 72 चेंडूत नाबाद 77 धावा फटकावल्या.
सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या आठ षटकांतच विदर्भने पहिले तीन गडी गमविले. उनादकटने अथर्व तायडेला 1 धावेवर बाद केले. गणेश सतीश व यश राठोडही स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार फैज फझल (23) व यष्टिरक्षक अक्षय वाडकर (18) यांनी चौथ्या गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी केली. प्रेरक मंकडने ही जोडी फोडताना वाडकरला त्रिफळाचीत केले. विदर्भचा निम्मा संघ 66 धावांत तंबूत विसावला होता. अपूर्वा वानखेडेने कडवा प्रतिकार करीत 69 चेंडूत 72 धावा फटकावल्याने त्यांना दीडशेची मजल मारता आली. चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, युवराज चुडासामा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः विदर्भ 40.3 षटकांत सर्व बाद 150 (अपूर्वा वानखेडे 72, फझल 23, चुडासामा 2-15, उनादकट 2-25, जडेजा 2-34, चिराग जानी 2-34) पराभूत विरुद्ध सौराष्ट्र 20.1 षटकांत 3 बाद 151 (प्रेरक मंकड नाबाद 77, अर्पित वासवदा नाबाद 41, आदित्य ठाकरे 2-13).